पंचतारांकित 'द ललित' हॉटेलमध्ये लसीकरण; क्रिटीकेअर रुग्णालयाची चौकशी होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 17:09 IST2021-05-30T17:06:03+5:302021-05-30T17:09:27+5:30
द ललित या पंचतारांकित हॉटेलमधील लसीकरण केंद्राची महापौरांकडून आकस्मिक पाहणी. घरगुती वापराच्या फ्रिजमध्ये साठवण्यात आल्या होत्या लसी.

पंचतारांकित 'द ललित' हॉटेलमध्ये लसीकरण; क्रिटीकेअर रुग्णालयाची चौकशी होणार
मुंबई : 'द ललित' या पंचतारांकित हॉटेलात पॅकेजमध्ये लस दिली जात असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांना समाजमाध्यमातून समजलं होतं. त्यानंतर या पंचतारांकित हॉटेलमधील लसीकरण केंद्राची पेडणेकर यांनी रविवारी आकस्मिक पाहणी केली. पेडणेकर यांनी या प्रकाराबाबत हॉटेलच्या व्यवस्थापकांना जाब विचारला. ललितमध्ये क्रिटीकेअर रुग्णालयाच्या माध्यमातून लस दिली जात आहे. मात्र, येथील लस साठवणीच्या पद्धतीबाबत साशंकता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाणार असून क्रिटीकेअर रुग्णालयाचीही चौकशी केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
मुंबईतील काही हॉटेल त्यांच्या पॅकेजमधून कोविड लस देत आहेत, हे समाजमाध्यमातून समजल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी चौकशी करण्यासाठी थेट द ललित हॉटेलला भेट दिली. पाहणी दरम्यान लस ठेवण्यासाठी असलेल्या शीत पेट्यांचे व्यवस्थित परीरक्षण होत नसल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. याबाबत हॉटेलच्या व्यवस्थापकांना महापौरांनी जाब विचारून लस सुरक्षिततेबाबत हॉटेल प्रशासन गंभीर नसून या ठिकाणी सर्व नियमांचे उल्लंघन करून येथे नागरिकांना कोविड लस दिली जात असल्याचं निदर्शनास आले आहे.
घरगुती वापराच्या फ्रीजमध्ये लसी
या पाहणीत इतर अनेक गोष्टी समोर आल्या. ललित हॉटेलमध्ये कोल्ड चेन मेन्टेन केली जात नव्हती. घरगुती वापराच्या फ्रीजमध्ये कोविड लसींचा साठा करण्यात आला होता. आइस बॅग म्हणून पाण्याच्या बाटल्यांचा वापर केला जात होता. त्यामुळं द ललितमध्ये झालेल्या लसीकरणाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.