Join us  

Coronavirus In Maharashtra: राज्यात १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण १५ मेनंतरच; जुलै-ऑगस्टमध्ये तिसरी लाट येण्याचाही इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 6:28 AM

राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.

मुंबई : जुलै, ऑगस्टदरम्यान राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येऊ शकते, असा साथरोग तज्ज्ञांचा अंदाज असून त्यापूर्वी ऑक्सिजनच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण करण्याची शासनाने तयारी सुरू केली आहे. तसेच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा प्रारंभ १५ मेनंतर करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.

जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी कोविड उपाययोजनेसंदर्भात दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठक घेतली. त्यानंतर टोपे यांनी प्रस्तुत माहिती दिली.टोपे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनचे प्रकल्प उभे केले जातील. त्यासाठी आवश्यक उपकरणे व यंत्रे खरेदी करण्यात येत आहेत. जुलै महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी राज्य ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण होईल, असा दावाही त्यांनी केला.

लसीचे दर घटल्याने राज्याला दिलासा

भारत बायोटेकने त्यांच्या कोव्हॅक्सिन लसीचा दर प्रति मात्रा २०० रुपयांनी घटवला आहे. सीरमने यापूर्वी त्यांच्या कोविशिल्डचा दर १०० रुपयांनी कमी केला आहे. राज्याला देण्यात येणाऱ्या लसीचे दर कमी झाल्याने राज्यावर पडणारा आर्थिक बोजा काही प्रमाणात कमी झाला असून हा मोठा दिलासा असल्याचे टोपे म्हणाले.

किमान २५ लाख लस कुप्यांचा साठा करणार

सध्या केवळ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यासाठी लस केंद्र सरकार पुरवत आहे. ४५ वयाखालील नागरिकांसाठी राज्याला लस मिळवण्यात अनेक अडचणी येत आहेत. लसींची उपलब्धता नाही. कमी लस पुरवठ्यामुळे गर्दी, गाेंधळ होऊ शकतो. म्हणून किमान २५ लाख लस कुप्या राज्याला प्राप्त झाल्याशिवाय सरकार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा प्रारंभ करणार नाही. त्यामुळे किमान १५ मेपर्यंत तरी या गटातील नागरिकांना लस टोचणे शक्य नाही, अशी माहिती टोपे यांनी दिली.

टॅग्स :राजेश टोपेमहाराष्ट्र सरकारकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस