मोकळ्या जमिनींचा भाव वधारला; गोडाऊनला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 12:05 AM2020-10-06T00:05:58+5:302020-10-06T00:06:07+5:30

कोरोना काळातील बदलता ‘मार्केट ट्रेंड’

Vacant land prices rose; Demand for godown | मोकळ्या जमिनींचा भाव वधारला; गोडाऊनला मागणी

मोकळ्या जमिनींचा भाव वधारला; गोडाऊनला मागणी

Next

मुंबई : कोरोना संक्रमणाच्या काळात मालमत्तांच्या व्यवहारांना उतरती कळा लागली असली तरी अनलॉकच्या टप्प्यांमध्ये मोकळ्या जमिनींचा भाव मात्र वधारला आहे. तसेच, उत्पादनांच्या साठवणुकीसाठी जागांची मागणी वाढत असून मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू या शहरांनजीकच्या परिसरात त्यासाठी आवश्यक असलेल्या गोदामांची सध्या चलती आहे. अ‍ॅनरॉक प्रॉपर्टी आणि नाईट फ्रँक या सल्लागार संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या स्वतंत्र सर्वेक्षण अहवालातून ही माहिती हाती आली आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातल्या मोठ्या शहरांमध्ये मोकळ्या जमीन खरेदीवर मर्यादा असली तरी छोटी उपनगरे आणि ग्रामीण भागामध्ये १,६०० ते ५००० चौरस फुटांपर्यंतच्या प्लॉटला मागणी वाढू लागली आहे. त्यांची किंमत १४ लाखांपासून ते ७० लाखांपर्यंत असून, मोठे क्षेत्रफळ असलेल्या जागांना जास्त मागणी असल्याचे निदर्शनास येत आहे. नेरळ, वारई, शहापूर, पालघर, बोईसर, खालापूर या भागात छोट्या प्लॉटची खरेदी किंवा विकास केलेल्या प्लॉटच्या अनेक स्कीम असून तिथली विक एंड घरे किंवा बंगले घेण्याकडे कल वाढू लागला आहे. सरासरी १६०० रुपये प्रति चौरस मीटर असा इथल्या काही जागांचा भाव आहे. तयार घरांपेक्षा जमीन खरेदीत पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळतो. ती तुलनेने कमी किमतीत उपलब्ध आहे. या भागांतील प्रस्तावित पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे भविष्यात इथल्या जागांना चांगला भाव येईल अशी आशा आहे. त्यामुळे जमीन खरेदी करण्याचा कल वाढल्याचे निरीक्षण अ‍ॅनरॉक प्रॉपर्टीने आपल्या अहवालात नोंदविले आहे.

तीन वर्षांत चौपट वाढ
नाईट फ्रँकने आपला एशिया पॅसिफिक वेअर हाऊस रिव्ह्यू रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध केला आहे. १७ प्रमुख शहरांचा आढावा त्यात घेण्यात आला असून मुंबई महानगरातील गोदामांचे भाडे ३ ते ५ टक्क्यांनी वाढल्याचे निरीक्षण त्यात नोंदविण्यात आले आहे. भारतातील २२ शहरांमध्ये गोदामांची मागणी लक्षणीयरीत्या वाढत असून २०१७ मध्ये १ कोटी ९ लाख चौरस फूट जागेची मागणी होती. ती आता ४ कोटी १३ लाख चौरस फुटांवर गेली आहे.

Web Title: Vacant land prices rose; Demand for godown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.