Join us  

उत्तर प्रदेशात सरकारी वैद्यकीय सेवा बालकांसाठी  ‘यमदूत’ - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2017 7:51 AM

उत्तर प्रदेशातील सरकारी वैद्यकीय सेवांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई, दि. 5 - उत्तर प्रदेशातील सरकारी वैद्यकीय सेवांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूरमधील बाबा राघवदास इस्पितळातील 1300 बालकांच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच, उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्हा रुग्णालयातही गेल्या महिनाभरात ऑक्सिजनच्या अभावी 49 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याचाच दाखल देत उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातील सरकारी वैद्यकीय सेवा बालकांसाठी यमदूत ठरलीय, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. 

दरम्यान,  या प्रकारामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर टीका सुरू झाली असून, भाजपाचे नेतेही अस्वस्थ झाले आहेत. फरुखाबादमधील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात हा प्रकार घडल्याचे रविवारी उघडीस आले. ही बालके 21 जुलै ते 20 ऑगस्ट या काळात मरण पावली. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी या संबंधीच्या बातम्या प्रसारित केल्यानंतर, मुख्यमंत्री कार्यालयाने याची दखल घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र कुमार यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले. रवींद्र कुमार व नगर दंडाधिकारी जयेंद्र कुमार जैन यांनी चौकशी करून, सर्व बालकांचे मृत्यू ऑक्सिजनच्या अभावी आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.काय आहे आजचे सामना संपादकीय?उत्तर प्रदेशात सरकारी वैद्यकीय सेवा पुन्हा एकदा बालकांसाठी  ‘यमदूत’ ठरली आहे. गेल्या महिन्यात गोरखपूर येथील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनअभावी ७० बालकांचा मृत्यू झाला होता. आता फर्रुखाबाद येथील डॉ. राम मनोहर लोहिया इस्पितळातही ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने ४९ बालकांना जीव गमवावा लागल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. इस्पितळाच्या संबंधित अधिकाऱयांविरुद्ध गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. ‘सरकारी कारवाई’ म्हणून सरकारचे हे पाऊल ठीक असले तरी आधी इस्पितळात बालमृत्यू आणि नंतर कारवाई हे किती दिवस चालणार? गोरखपूर येथील बालहत्याकांडानंतरही सरकारी इस्पितळांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा मध्येच थांबत असेल आणि उपचार घेणारी बालके तडफडत मरण पावत असतील तर कसे व्हायचे? योगी सरकारच्या कारवाईला प्रशासन आणि संबंधित पुरवठादार जुमानत नाहीत असा त्याचा अर्थ घ्यायचा का? पुन्हा गोरखपूरमध्ये ऑक्सिजनचा साठा संपल्याने बालके दगावली होती. आता फर्रुखाबादमध्ये ऑक्सिजनसोबतच औषधांचा अभावदेखील ४९ बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला असे सांगण्यात येत आहे. हे तर अधिकच गंभीर म्हणावे लागेल. मुळात सरकारी इस्पितळांमध्ये धाव घेणारे रुग्ण गरीब किंवा मध्यवर्गीय कुटुंबातीलच असतात. सरकार आणि सरकारी यंत्रणा म्हणजे मायबाप या एका आशेने ते सरकारी वैद्यकीय सेवेकडे पाहत असतात. मात्र हेच मायबाप जर ‘ऑक्सिजन’वर असतील तर ते रुग्णांना कुठून ऑक्सिजन देणार? पाच-सहा वर्षांपूर्वी कोलकाता येथील एका इस्पितळात डेटॉलऐवजी कार्बोलिक ऑसिड वापरले गेल्याने १५ दिवसांत ५० बालकांना प्राण गमवावे लागले होते. तेथील ममता सरकारवर त्यावेळी आरोप करणारे आज उत्तर प्रदेशात सत्तेत आहेत. तेथे काल ऑक्सिजनअभावी ७० मुले दगावली, आज ऑक्सिजन आणि औषधे न मिळाल्याने ४९ बालकांचा तडफडून मृत्यू झाला. उद्या या यादीत आणखी जीवघेण्या गोष्टींची भर पडेल आणि बालहत्याकांड सुरूच राहील. सरकारी वैद्यकीय सेवा हे असेही आपल्याकडे एक ‘प्रश्नचिन्ह’च आहे. मात्र  उत्तर प्रदेशातील सरकारी इस्पितळांतील वैद्यकीय सेवा बालकांसाठी देवदूत ठरण्याऐवजी ‘यमदूत’ ठरली आहे असेच म्हणावे लागेल.

 

टॅग्स :उद्धव ठाकरेभाजपा