Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेलो टेप, फेवी क्विकने एटीएममध्ये चोरी ! आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश 

By गौरी टेंबकर | Updated: December 22, 2023 17:08 IST

कुरार पोलिसांनी कारवाई केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

गौरी टेंबकर ,मुंबई: एटीएम मशीनच्या कॅश डिस्पेन्सरला फेविक्विक आणि सेलोटेप चिटकवून बंद करत बँक ग्राहकांचे पैसे चोरणाऱ्या ६ जणांच्या आंतरराज्यीय टोळक्याला अखेर अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कुरार पोलिसांनी केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

कुरार पोलिसांच्या हद्दीत असलेल्या शिवाजीनगर परिसरात एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये तक्रारदार हे २१ डिसेंबर रोजी पैसे काढायला गेले होते. त्यांनी सर्व प्रक्रिया योग्य करूनही पैसे बाहेर आले नाहीत. अशाप्रकारे  त्यांना २ हजार रुपयांचा चुना लावण्यात आला. याची तक्रार त्यांनी कुरार पोलिसांना केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे, संजीव गावडे आणि पथकाने तपास सुरू करत सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची पडताळणी केली. ज्या त्यांना एक ऑटो रिक्षा संशयितपणे त्याच परिसरात सुसाट जाताना दिसली. पोलिसांनी त्या रिक्षाचा नंबर मिळवत आप्पा पाडा रिक्षा स्टॅन्ड जवळून चौघांना ताब्यात घेतले. 

अधिक चौकशीमध्ये त्यांच्याकडे एटीएम मशीनमध्ये छेडछाड करताना कॅश डिस्पेन्सरवर चिकटवण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिकच्या २७ पट्ट्या, फेविक्विकचे २५ पाऊच तसेच ६ ट्यूब, पांढऱ्या रंगाच्या सेलोटेप, वेगवेगळ्या बँकांची १० एटीएम कार्ड आणि तक्रारदाराचे चोरलेले दोन हजार रुपये त्यांच्याकडे सापडले. त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली ऑटो रिक्षा ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रामू राम उर्फ आदित्य भारतीया (२९), सुरज तिवारी (२२) , संदीप कुमार यादव (२४), अशोक यादव (३६), राकेश कुमार यादव (४०) आणि रवी कुमार यादव  (३१) अशी आहेत. या टोळक्याने समता नगर पोलिसांच्या हद्दीतही असा प्रकार केल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या प्रयागराज या ठिकाणी त्यांच्यावर एकूण ११ गुन्हे दाखल असून त्यांचे अन्य कोणी साथीदार आहेत का याचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस