उर्वीने अदृश्य रसातून जगाला दिली ‘सौंदर्य’शास्त्राची दृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 06:25 AM2019-10-04T06:25:16+5:302019-10-04T06:25:36+5:30

सौंदर्यशास्त्र हे फक्त दृष्टी असलेल्यांसाठी नसून दृष्टिहीनांसाठीही आहे आणि दृष्टीशिवाय स्पर्श, गंध, आवाज व स्वाद यांनीही ते अनुभवता येत असते हे सांगणाऱ्या संकल्पनेचा विस्तार आणि मांडणी उर्वी जंगम या विद्यार्थिनीने आपल्या शोधप्रबंधात केली आहे.

Urvi gives the world the vision of 'beauty' through the invisible juice | उर्वीने अदृश्य रसातून जगाला दिली ‘सौंदर्य’शास्त्राची दृष्टी

उर्वीने अदृश्य रसातून जगाला दिली ‘सौंदर्य’शास्त्राची दृष्टी

Next

- सीमा महांगडे
मुंबई : सौंदर्यशास्त्र हे फक्त दृष्टी असलेल्यांसाठी नसून दृष्टिहीनांसाठीही आहे आणि दृष्टीशिवाय स्पर्श, गंध, आवाज व स्वाद यांनीही ते अनुभवता येत असते हे सांगणाऱ्या संकल्पनेचा विस्तार आणि मांडणी उर्वी जंगम या विद्यार्थिनीने आपल्या शोधप्रबंधात केली आहे. जन्मत: दृष्टिहीन असलेल्या उर्वीने जर्मन स्टडीज्मध्ये या अदृश्य रसाची संकल्पना मांडली असून आपली पीएच.डी. पूर्ण केली आहे. जर्मन स्टडीज्मध्ये पीएच.डी. करणारी उर्वी जंगम ही भारतातील पहिली दृष्टिहीन विद्यार्थिनी ठरली आहे.

विशेष म्हणजे ३१ वर्षीय उर्वीने हा शोधप्रबंध मुंबई विद्यापीठामधून पूर्ण केला असून जगभरातील लोकांसाठी परिसंवाद आणि वर्कशॉप्स घेऊन सौंदर्यशास्त्राच्या अदृश्य रस या संकल्पनेची मांडणी आता तिला करायची आहे. सौंदर्यशास्त्रासारखा विषय ज्यामध्ये नवरस आहेत, हे नवरस स्थायी, व्यभिचारी, विभाव व अनुभाव या चार मुख्य भावांवर अवलंबून असतात. मात्र, अद्याप ते फक्त दृश्य स्वरूपातच मांडण्यात आले आहेत.

दृष्टिहीनांसाठीही सौंदर्यशास्त्राच्या स्वत:च्या व्याख्या आहेत, याची मांडणी व संकल्पना आतार्यंत करण्यात आली नव्हती. त्यामुळे एका निबंध स्पर्धेच्या निमित्ताने जर्मनीला गेलेल्या आणि त्यानिमित्ताने तिला विचारल्या जाणाºया प्रश्नांमुळे तिने आपल्या शोधप्रबंधासाठीच या विषयाची निवड केली.

२०१३ ते २०१८ या काळात उर्वीने आपल्या शोधप्रबंधावर विविध साहित्यांचा, प्रवास वर्णनांचा अभ्यास करून फेब्रुवारी २०१९ मध्ये शोधप्रबंध सादर केला. या शोधप्रबंधासाठी तिला जर्मन स्टडीज्च्या प्राध्यापिका विभा सुराणा यांचे मार्गदर्शन मिळाले. शिवाय डॉ. एंड्रिया बॉन्गर यांचीही मदत मिळाल्याचे तिने आवर्जून सांगितले.

१६ व्या वर्षीच जर्मन भाषा विषय म्हणून घेणा-या उर्वीने आपला हा २४० पानांचा शोधप्रबंध संपूर्ण जर्मन भाषेत सादर केला असून तो पूर्ण करण्यासाठी तिला असंख्य अडचणी आल्या. मात्र आईवडिलांचा भक्कम पाठिंबा आणि प्राध्यापिकांचे मार्गदर्शन तसेच सहकाऱ्यांची मदत यामुळे आपण हा शोधप्रबंध पूर्ण करू शकलो, असे उर्वीने सांगितले. तिचे शालेय शिक्षण सामान्य मुलांप्रमाणे सामान्य शाळेत झाले. आईवडिलांची मोलाची साथ मिळाली, म्हणूनच समर्थपणे सामान्य शाळेत शिक्षण घेणे शक्य झाले, असे ती म्हणाली.

अदृश्य रसाची संकल्पना ही थिएटर, पेंटिंग, फाईन आर्टशिवाय दृष्टिहीनांसह सामान्य व्यक्तींनाही उपयुक्त ठरणार असल्याची माहिती तिने दिली.

मेहनतीने मिळवले यश
उर्वीची अदृश्य रसाची संकल्पना आणि निर्मिती हा एक वेगळा विषय असून दृष्टिहीन व्यक्तींसाठीच नाही, तर सामान्य लोकांसाठीही ती उपयुक्त ठरेल. एका दृष्टिहीन विद्यार्थिनीने जर्मन स्टडीज्मध्ये शोधप्रबंध सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासाठी आमची मदत तिला झाली असली तरी काहीही आधीचे साहित्य उपलब्ध नसताना तिने तिच्या मेहनतीने या विषयावरील माहिती आणि मजकुराचे संपादन करून हे यश मिळविले, हे कौतुकास्पद आहे.
- विभा सुराणा,
प्राध्यापिका, जर्मन स्टडीज्

Web Title: Urvi gives the world the vision of 'beauty' through the invisible juice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई