Join us

उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला बाय-बाय ? कोणता झेंडा घेणार हाती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 18:18 IST

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

मुंबई - काँग्रेसमधील धुसफुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सामूहिक नेतृत्वाच्या प्रस्तावावरून मिलिंद देवरा विरुद्ध संजय निरुपम या वादात सोमवारी ऊर्मिला मातोंडकरच्या पत्राची भर पडली. स्थानिक नेते, विशेषत: संजय निरुपम यांच्या समर्थकांमुळेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागल्याचा थेट आरोप ऊर्मिलाने पत्राद्वारे केला होता. ऊर्मिलाचे हे नऊ पानी पत्रच सोमवारी व्हायरल झाले. त्यामुळे उर्मिला मांतोडकर नाराज असून ती लवकरच काँग्रेसला बाय-बाय करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. तसेच, काँग्रेसला रामराम केल्यानंतर उर्मिला जयश्रीराम म्हणणार की 'मनसे' शिवबंधन बांधणार याची चर्चा रंगली आहे. 

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई काँग्रेसमध्ये सामूहिक नेतृत्वाचा प्रस्तावही त्यांनी मांडला. पक्षाला खड्ड्यात नेणारा प्रस्ताव, अशी संभावना करत संजय निरुपम यांनी देवरा यांच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला होता. मुंबई काँग्रेसमधील लाथाळ्यांच्या या नव्या अंकात ऊर्मिलाच्या पत्राची भर पडली. 16 मे रोजी तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना ऊर्मिलाने हे नऊ पानी पत्र पाठविले होते. व्यक्तिगत हेवेदावे, अहंकारामुळे स्थानिक नेत्यांनी मुद्दामहून काँग्रेसचा प्रचार भरकटवल्याचा आरोप ऊर्मिलाने या पत्रात केला होता. उर्मिलाचे हे पत्र व्हायरल झाल्यामुळे तिने संताप व्यक्त केला आहे. तसेच, काँग्रेसमधील अंतर्गुत धुसफूस आणि मुंबईतील काँग्रेस नेत्यांच्या उचापतीमुळे पक्षाला बाय-बाय करण्याचा विचार उर्मिलाचा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर उर्मिला मांतोडकर काँग्रेसपासून दुरावत असल्याचे दिसत आहे. 

दरम्यान, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे मुख्य समन्वयक संदेश कोंडविलकर, भूषण पाटील आदी नेत्यांनी काँग्रेसच्या प्रचारात खोडा घातला. या नेत्यांच्या बेशिस्त वर्तन आणि राजकीय शहाणपणाच्या अभावी सतत अनावश्यक वाद निर्माण झाले. परिणामी, तळागाळातील कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचल्याचा आरोप ऊर्मिलाने या पत्रात केला होता. पक्षाच्या हितासाठी या नेत्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही ऊर्मिलाने पत्रात केली आहे. मात्र, अद्याप याबाबत कुठलिही कारवाई झाली नसल्याने ती नाराज आहे.  

टॅग्स :उर्मिला मातोंडकरशिवसेनाकाँग्रेसराजकारण