यूपीएससी परीक्षेत ठाणे-मुंबईचा डंका! सी. डी. देशमुख संस्थेचे ९ उमेदवार यशस्वी; पवईची दीपाली महातो देशात ३६ वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 05:01 IST2026-03-07T05:00:19+5:302026-03-07T05:01:21+5:30
UPSC Result Marathi News यूपीएससी परीक्षेत ठाणे-मुंबईचा डंका! सी. डी. देशमुख संस्थेचे ९ उमेदवार यशस्वी; पवईची दीपाली महातो देशात ३६ वी

यूपीएससी परीक्षेत ठाणे-मुंबईचा डंका! सी. डी. देशमुख संस्थेचे ९ उमेदवार यशस्वी; पवईची दीपाली महातो देशात ३६ वी
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या (यूपीएससी) परीक्षेत पवईमधील दीपाली महाताे ३६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. ठाणे पालिकेच्या सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील तिच्यासह नऊ उमेदवार उत्तीर्ण झाले.
दीपालीने गेल्या वेळी १०४ क्रमांक मिळवीत आयपीएस हाेण्याचा मान मिळविला हाेता. या वेळी तिने पुन्हा चांगल्या गुणांनी परीक्षा उत्तीर्ण हाेत आयएएस हाेण्याचे स्वप्न पूर्ण केल्याचे तिचे मार्गदर्शक आणि सी. डी. देशमुख प्रशिक्षण संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी सांगितले. मूळची ओडिशा येथील रहिवासी असलेल्या दीपालीचे वडील नाेकरीनिमित्त पवईत वास्तव्याला आहेत. ती दाेन वर्षांपासून ठाण्यातील सी. डी. देशमुख प्रशिक्षण केंद्रात यूपीएससीचा अभ्यास करत हाेती.
मुलुंडची अंकिता पाटील १४० व्या क्रमांकाने, तर माटुंग्याचा अभिषेक मगदूम ४४९, पुण्याचा धनंजय दिघे ५२९ क्रमांकाने उत्तीर्ण झाले. याशिवाय, मुंबईतील पारस मिस्त्री ५५५, पुण्याचा सिद्धार्थ तागड ६१९, डाेंबिवलीचा शिवम वखरे ६५१, ऐराेलीतील मनीष झेंडे ७८८, तर कल्याणचा प्रणव बेडारे हा ९२९ क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
मुंबईतील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था येथील २२ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.
तिसऱ्या प्रयत्नात यश
मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून कला शाखेतून पदवीधर झालेल्या प्रणवला हे यश अपेक्षित हाेते. २०२२ पासून त्याने पूर्णपणे याच परीक्षेवर लक्ष केंद्रित केले. हा त्याचा तिसरा प्रयत्न हाेता. पहिल्या आणि दुसऱ्या वेळी पूर्व परीक्षेत अपयश आले. राेज आठ ते दहा तास अभ्यास केला. आपल्या मेहनतीसह शिक्षक आणि आईवडिलांना याचे सर्व श्रेय असल्याचे प्रणव म्हणाला.
आयपीएसचे ध्येय...
रुईयामधूनच सांख्यिकी विज्ञान शाखेतून पदवीधर असलेल्या शिवम वखरे यानेही राेज आठ ते दहा तास अभ्यासासाठी दिल्याचे सांगितले. ‘सी. डी. देशमुख’च्या जगताप यांच्यासह वडील राजेंद्र यांचेही चांगले मार्गदर्शन लाभले. गेल्या दाेन वर्षांपासून झाेकून देत आठ ते दहा तास अभ्यास केला. गेल्या वेळी १४ गुणांनी निवड हुकली. आयपीएस हाेण्याचे ध्येय ठेवत या वेळी चांगला अभ्यास केला. आयआरएस म्हणून निवड होऊ शकते. आई, वडील, भाऊ आणि शिक्षक यांचे हे श्रेय असल्याचे शिवम म्हणाला.
सरकारी सेवेमुळे आनंद
विद्याविहार येथील के. जे. सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी असलेल्या अंकिता पाटील हिने घवघवीत यश मिळविले. गेल्यावर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली होती. त्यावेळी आयआरएस म्हणून पोस्ट मिळाली. मात्र आयएएस होण्याची इच्छा असल्याने यंदा पुन्हा परीक्षा दिली. त्यात १४० वा रँक मिळाला आहे. ‘आयएएस किंवा आयपीएस मिळेल अशी आशा आहे. माझे वडील अंधेरी येथे आरटीओ अधिकारी आहेत. आता मी ही सरकारी सेवेत आल्याने कुटुंबातील सर्वच जण आनंदीत आहेत’, असे अंकिता हिने सांगितले.