26/11 - 12 वर्षानंतर अद्ययावत नियंत्रण कक्षाचे मुंबईवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 06:35 AM2020-11-24T06:35:13+5:302020-11-24T06:35:43+5:30

परिस्थितीचे चित्रीकरण थेट पाहणे शक्य

Updated control room's focus on Mumbai | 26/11 - 12 वर्षानंतर अद्ययावत नियंत्रण कक्षाचे मुंबईवर लक्ष

26/11 - 12 वर्षानंतर अद्ययावत नियंत्रण कक्षाचे मुंबईवर लक्ष

Next

मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी मुंबई पोलीस दल अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज केले जात आहे. हल्ल्यादरम्यान कोलमडलेला नियंत्रण कक्षही अद्ययावत बनला असून, चांगली कामगिरी बजावताना दिसत आहे.

बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत मुंबई पोलीसही नवनवीन तंत्रज्ञानाशी जोडले गेले. अद्ययावत वेबसाइट, अत्याधुनिक नियंत्रण कक्ष तसेच पोलीस अधिकाऱ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाउंटनेही कात टाकली.
२६/११ च्या हल्ल्यानंतर शहरातील अतिसंवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी तब्बल ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबरोबरच मुंबई पोलीस दलाला आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी सर्व्हिलन्स व्हॅन देण्यात आली. शहरात कुठेही दंगल, मोर्चा, मोठे आंदोलन, सभा किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ही व्हॅन तेथे पाठविण्यात येते. याद्वारे तेथील परिस्थितीचे चित्रीकरण करून ते थेट मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून बघता येते. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील नव्या इमारतीत सहाव्या मजल्यावर हा अद्ययावत नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. २६/११ दरम्यान हजारो कॉल एकाच वेळी आल्यामुळे हा नियंत्रण कक्ष कोलमडला होता. मात्र सध्या तो कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सुसज्ज आहे. सोबतच ॲम्बिस प्रणालीचा वापर सुरू झाल्याने गुन्हेगारास तत्काळ अटक होण्यासोबतच गुन्हे व दोषसिद्धीचे प्रमाण वाढले आहे. मात्र बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानानुसार, या यंत्रणेत आणखी बदल होणे गरजेचे असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

ॲम्बिस प्रणाली म्हणजे काय?
पूर्वी बोटांच्या ठशांवरून आरोपींची ओळख पटवण्यात येत असे. मात्र अ‍ॅम्बिस प्रणालीमुळे बोटांच्या ठशांसोबत बुब्बुळ, हाताच्या तळव्यांचे ठसे, चेहेरा किंवा छायाचित्रांद्वारे संशयित, आरोपीची ओळख चुटकीसरशी पटवता येते. एकाच वेळी साडेसहा लाख गुन्हेगारांचे तपशील ही यंत्रणा उपलब्ध करून देत आहे. छायाचित्रावरून किंवा सीसीटीव्हींनी कैद केलेल्या चित्रणावरूनही गुन्हेगारांची ओळख पटू शकते. महाराष्ट्र सायबरने पुढाकार घेऊन ही अद्ययावत प्रणाली विकसित केली आहे.
 

Web Title: Updated control room's focus on Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.