मुंबई - गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. त्यानिमित्त गणेशोत्सव पोर्टल व ‘आला रे आला... राज्य महोत्सव आला..’ या गीताचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते वांद्रे येथील एमएसआरडीसी कार्यालयात शनिवारी लोकार्पण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा यंदापासून तालुकास्तरापर्यंत विस्तारित करण्यात आली असून, प्रवेश अर्ज प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध आहे. राज्यस्तरीय प्रथम विजेत्यास ७ लाख ५० हजार, जिल्हास्तरीय ५० हजार, तालुकास्तरीय २५ हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर, खुल्या गटातून महसूल विभागीय तसेच राज्यस्तरावर रील बनविण्याची भव्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री शेलार यांनी यावेळी केली. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे यावेळी उपस्थित होते.