Unlock 2: Using even odd rules for vehicles will avoid traffic jams | Unlock 2: वाहनांसाठी सम विषम नियम वापरला तर वाहतूक कोंडी टळेल

Unlock 2: वाहनांसाठी सम विषम नियम वापरला तर वाहतूक कोंडी टळेल

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन किमी अंतराचा नियम लागू केला आहे. परंतु त्यामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परंतु वाहनांसाठी सम विषम नियम लागू केला तर वाहतूक कोंडी टळेल, असे मत वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार यांनी व्यक्त केले.

दातार म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले जे लक्ष्य आहे, संसर्ग टाळणे, संपर्क नको, पण ते अशक्य आहे. मुंबईत वाहतूक पोलीस विविध नियम लागू करत आहेत. दोन किमी अंतराबाबतचा त्यांचा निर्णय चुकीचा होता. त्यापेक्षा इतर पर्याय वापरता आले असते. दिल्लीप्रमाणे वाहनांसाठी सम विषम नियम वापरता आला असता. खासगी वाहने आणि दुचाकी यांना हा नियम लागू करायला पाहिजे. सर्व रस्त्यांवर नाही तर ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी असते ते वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, पेडर रोड, दादर येथे हा नियम लागू केल्यास वाहतूक कोंडी कमी होईल. अन्यथा वाहतूक पोलिसांनी ८ ते १० मार्गांची निवड करून हा नियम लागू करावा असे त्यांनी सांगितले.

दातार पुढे म्हणाले की, एका बसमध्ये १५ गाड्यांतील प्रवासी प्रवास करू शकतात. बेस्टकडे २५०० गाड्या आहेत. सहा हजार स्कूल बसेस अतिरिक्त आहेत, त्या चालकासह दोन-तीन महिन्यांसाठी मिळू शकतात. त्या चालकांसाठी लाँग ट्रीप दिली तर वाहतुकीवर मोठा ताण कमी होईल. त्या काळात रेल्वेचे नियोजन करायला हवे. त्याचा वाहतुकीवरील भार कमी करण्यास मदत होईल.

लोकांचा मानसिक पाठिंबा मिळायला हवा
दोन किमी अंतराचा निर्णय चुकीचा आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करणे अवघड आहे. त्यावर लोकांची नाराजी आहे. पाच पाच हजार गाड्या जप्त केल्या तर त्याचे काय करायचे, असा प्रश्न आहे. यामुळे एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याला लोकांचा पाठिंबा मिळायला हवा. लॉकडाऊन लोकांनी मानसिकदृष्ट्या स्वीकारले, त्याप्रमाणे हा निर्णय स्वीकारायला हवा होता, असे त्यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Unlock 2: Using even odd rules for vehicles will avoid traffic jams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.