सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त मुंबईत एकता दौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 01:14 AM2019-11-01T01:14:49+5:302019-11-01T01:14:58+5:30

सरदार पटेल यांनी भारताला एकसंघ ठेवण्याचे काम केले. त्यामुळेच त्यांना लोहपुरुष म्हटले जाते.

Unity tour in Mumbai for Sardar Patel's birth anniversary | सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त मुंबईत एकता दौड

सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त मुंबईत एकता दौड

Next

मुंबई : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरात एकता दौडचे आयोजन करण्यात आले. वरळी येथील एनसीपीए ते मरिन ड्राइव्हपर्यंतच्या दौडला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखविला. तत्पूर्वी राज्यपालांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ देऊन शुभेच्छा दिल्या.

सरदार पटेल यांनी भारताला एकसंघ ठेवण्याचे काम केले. त्यामुळेच त्यांना लोहपुरुष म्हटले जाते. त्यांच्या जन्मदिनी एकतेची शपथ घेत ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना पुढे नेण्याचे काम करीत आहोत. केंद्र सरकारने ३७० कलम हटवून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश केले, हे भारताचे अविभाज्य अंग आहेत. या निर्णयामुळे सरदार पटेल यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राहुल नार्वेकर, राहुल कुल, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.

एकता दौडमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय कॅडेट कोर, जलद कृती दल (क्यूआरटी), कमांडो, पोलीस पथके, बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक यांचे कर्मचारी, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्काऊट-गाईडसह क्रीडा अधिकारी, प्रशिक्षक यांच्यासह बालकांपासून वृद्धांपर्यंत नागरिक सहभागी झाले होते. सर्वांनी उत्साहाने दौडचा आनंद घेतला. तत्पूर्वी महेश नावले कराटे अ‍ॅण्ड डान्स असोसिएशन आणि एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमातून राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. एकता दौडचा समारोप मरिन ड्राइव्ह येथील ग्रँट मेडिकल कॉलेज जिमखाना येथे झाला. वांद्रे येथील अ‍ॅम्फी थिएटर, कार्टर रोडपासून ओटर्स क्लबपर्यंत आणि तेथून परत अ‍ॅम्फी थिएटरपर्यंत अशी एकता दौड आयोजित करण्यात आली. या दौडमध्ये शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, एन.सी.सी. विद्यार्थी सहभागी झाले. शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या या दौडला मंत्री आशिष शेलार यांनी हिरवा झेंडा दाखविला. शेलार यांनी सहभागींना राष्ट्रीय एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्याबाबत शपथ दिली.

Web Title: Unity tour in Mumbai for Sardar Patel's birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.