मासिक पाळीविषयी जागरूकता निर्माण करून आत्मविश्वास वाढवणे गरजेचे- पियुष गोयल
By मनोहर कुंभेजकर | Updated: March 15, 2025 16:49 IST2025-03-15T16:48:46+5:302025-03-15T16:49:39+5:30
उत्तर मुंबईतील महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा २० सॅनिटरी पॅड उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश त्यांनी मुंबई महापालिकेला दिले.

मासिक पाळीविषयी जागरूकता निर्माण करून आत्मविश्वास वाढवणे गरजेचे- पियुष गोयल
मनोहर कुंभेजकर, मुंबई: केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर मुंबईतील शालेय विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड वितरण उपक्रमाचा आज शुभारंभ केला. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे महानगरपालिका शाळांमधील सर्व मुलींना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे आणि मासिक पाळी स्वच्छतेविषयी जागरूकता वाढवणे हा आहे. यावेळी त्यांनी मासिक पाळीविषयीच्या गैरसमजुती दूर करण्याचे आणि मुलींना आवश्यक स्वच्छता उत्पादने पुरवण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई पब्लिक स्कूल, एमजी क्रॉस रोड क्र. १, कांदिवली पश्चिम येथे मासिक पाळी आणि स्वच्छता या संदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उत्तर मुंबईतील महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा २० सॅनिटरी पॅड उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश त्यांनी मुंबई महापालिकेला दिले.
मुंबईतील महानगरपालिका शाळांमध्ये सुमारे ५०,००० विद्यार्थीनी शिकत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना मासिक पाळी दरम्यान कोणत्याही अडचणीशिवाय शिक्षण सुरू ठेवता यावे, यासाठी महापालिकेला सॅनिटरी पॅड वेळेवर पोहोचविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. केवळ सॅनिटरी पॅड वाटप करणे महत्त्वाचे नाही, तर मासिक पाळीविषयी जागरूकता निर्माण करून आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे,” असे पियुष गोयल यांनी सांगितले. हा उपक्रम मुलींच्या आरोग्यविषयी सकारात्मक बदल घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून मुंबईतील विद्यार्थिनींसाठी अधिक समावेशक आणि समर्थक वातावरण निर्माण करण्यास मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला पालिका व शासकीय अधिकारी, शिक्षक, आरोग्य तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी मासिक पाळी स्वच्छतेच्या गरजेवर चर्चा केली.