"आता टोलबद्दल तुमची तक्रार राहणार नाही, १५ दिवसांत नवीन पॉलिसी..."; नितीन गडकरींचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 22:20 IST2025-04-14T22:00:48+5:302025-04-14T22:20:38+5:30

टोलबाबत येत्या १५ दिवसांत नवीन पॉलिसी येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली

Union Minister Nitin Gadkari informed that new policy regarding toll will be released in the next 15 days | "आता टोलबद्दल तुमची तक्रार राहणार नाही, १५ दिवसांत नवीन पॉलिसी..."; नितीन गडकरींचे मोठं विधान

"आता टोलबद्दल तुमची तक्रार राहणार नाही, १५ दिवसांत नवीन पॉलिसी..."; नितीन गडकरींचे मोठं विधान

Nitin Gadkari on Tolling System : राष्ट्रीय महामार्गावरील टोलवरुन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी येत्या ८-१० दिवसांत टोल शुल्क कमी करणार असल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर आता मुंबईत बोलताना नितीन गडकरी यांनी आता टोलबद्दल लोकांची तक्रार राहणार नसल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत नितीन गडकरी टोलबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात नितीन गडकरी यांनी टोल भरणाऱ्यांना दिलासा देण्यासाठीच्या धोरणावर काम सुरू असल्याचे म्हटलं होतं. टोलची रक्कम १०० टक्के कमी केली जाईल, असेही नितीन गडकरी म्हणाले होते. त्यानंतर आता १५ दिवसांच्या आत टोलबाबत नवीन पॉलिसी येणार असल्याचे गडकरींनी म्हटलं आहे. तसेच देशात आता टोलनाके राहणार नसल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. मुंबईतील अमर हिंद मंडळाच्या वसंत व्याख्येनमालेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. 

"टोलबद्दल मी जास्त सांगणार नाही. पण १५ दिवसांच्या आत अशी पॉलिसी येईल की टोलबद्दल तुमची कोणतीही तक्रार असणार नाही. पण मी महाराष्ट्रातील टोलबद्दल बोलत नाहीय. राष्ट्रीय महामार्गांबाबत बोलत आहे," असे नितीन गडकरी यांनी म्हटलं.

आता टोलनाके राहणार नाहीत

"आम्ही सॅटलाईट बेस फ्री टोलिंग सिस्टिम तयार करतोय. यामुळे टोलनाके राहणार नाहीत. तुम्हाला कोणी अडवणार नाही. कॅमेऱ्याद्वारे तुमच्या नंबरप्लेटवरून टोल निघेल. तुम्ही जिथून निघालात तिथपासून तुम्ही जिथून बाहेर पडाल तिथपर्यंतचाच टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाणार," असेही नितीन गडकरी म्हणाले.

मुंबई गोवा महामार्गासाठी खूप अडचणी आल्या, पण आता येणाऱ्या जून पर्यंत रस्ता १०० टक्के पूर्ण होईल. दिल्ली जयपूर आणि मुंबई गोवा अडचणीचा राहिला आहे. मात्र आता या अडचणी सुटल्या आहेत, असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला. 

Web Title: Union Minister Nitin Gadkari informed that new policy regarding toll will be released in the next 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.