ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांमध्ये एकसारखेपणा आवश्यक; टाटा रुग्णालयाच्या परिषदेत तज्ज्ञांचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 10:58 IST2025-10-12T10:58:06+5:302025-10-12T10:58:54+5:30
वुमन कॅन्सर इनिशिएटिव्ह आणि टाटा मेमोरिअल सेंटर यांच्या वतीने या २३व्या परिषदेचे आयोजन यशवंतराव सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांमध्ये एकसारखेपणा आवश्यक; टाटा रुग्णालयाच्या परिषदेत तज्ज्ञांचा सूर
मुंबई : कॅन्सरचा आजार म्हटला की, आजही रुग्णाच्या पायांखालची वाळू सरकते. या अशा परिस्थितीत ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग) उपचारात देशभरात एकसमानता आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही, असे मत टाटा रुग्णालयातर्फे आयोजित परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
वुमन कॅन्सर इनिशिएटिव्ह आणि टाटा मेमोरिअल सेंटर यांच्या वतीने या २३व्या परिषदेचे आयोजन यशवंतराव सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या तीनदिवसीय परिषदेमध्ये ब्रेस्ट कॅन्सर या आजाराशी संबंधित उपचार पद्धती या विषयावर चर्चा करण्यात आली. ऑक्टोबर महिना ‘ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता महिना’ साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला टाटा मेमोरिअल सेंटरचे माजी संचालक डॉ. आर. ए. बडवे, प्रा. डॉ. राजीव सरीन आणि ‘वुमन कॅन्सर इनिशिएटिव्ह’च्या उपाध्यक्षा देविका भोजवानी उपस्थित होत्या. दरम्यान, रविवारीसुद्धा व्याख्याने होतील.
कॅन्सरचा धोका किती?
देशात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा सर्वांत सर्वसामान्य कॅन्सर आहे. महिलांमध्ये होणाऱ्या सर्व कॅन्सरपैकी ३० टक्क्यांसाठी ब्रेस्ट कॅन्सर जबाबदार आहे. देशातील २० ते २५ महिलांपैकी एका महिलेला तिच्या आयुष्यात ब्रेस्टचा कॅन्सर होण्याचा धोका आहे. शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी यांसारख्या आधुनिक उपचारांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. या आजाराचे निदान लवकर झाल्यास उपचाराला चांगला प्रतिसाद मिळतो. परिषदेत निदान, उपचार आणि आवश्यक गोष्टींवर मार्गदर्शन करण्यात येईल.
ब्रेस्ट कॅन्सरसंदर्भात सबंध देशात एकच उपचार पद्धती असावी. त्याकरिता देशभरातून या परिषदेत आलेल्या कॅन्सर तज्ज्ञांचे मत जाणून एकमत केले जाणार आहे. याद्वारे रुग्णामधील संभ्रम टाळता येतो. सगळ्यांच्या सहमतीने उपचार पद्धती ठरविण्यात येणार आहे.
डॉ. राजेंद्र बडवे, माजी संचालक, टाटा मेमोरिअल सेंटर
१०% महिलांना ब्रेस्ट कॅन्सर आनुवंशिक
जेनेटिक कॅन्सर क्लिनिकचे प्रमुख डॉ. राजीव सरीन यांनी सांगितले, सुमारे १० टक्के महिलांना ब्रेस्ट कॅन्सर आनुवंशिक असू शकतो. कुटुंबामध्ये वारशाने तो आजार होण्याचा धोका असतो.
ज्या कुटुंबातील सदस्यांना ब्रेस्ट आणि सर्व्हायकल कॅन्सर असतो, अशा कुटुंबातील महिलांना सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका १५ पट अधिक असतो. २००३ मध्ये कॅन्सर जेनेटिक क्लिनिकची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून जेनेटिक चाचणी आणि समुपदेशन केले जाते.
देशात तरुणी आणि तरुणांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. जेनेटिक प्रयोगशाळांची गरज आहे. यामध्ये चाचणी सकारात्मक आली, तर स्तनाचा किंवा इतरत्र कॅन्सर होण्याची शक्यता कमी करण्यासाठी खबरदारी घेतली जाते.