मुंबई - नेहमीप्रमाणे मुलाला शाळेत घेऊन चाललेल्या महिलेच्या दुचाकीची डंपरशी भीषण धडक झाल्याने त्यात मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नेहरू नगरमध्ये घडली. घरातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या तासाभरातच दोघांच्या मृत्यूच्या बातमीचा कॉल आल्याने चेंबूरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. कविता सिंगाडिया (३२) आणि प्रवीण सिंगाडिया (१२) असे असे मृत मायलेकांचे नाव आहे.
कविता या चेंबूर येथे पती, सासू-सासरे आणि दोन मुलांसोबत राहत होत्या. त्यांचा मुलगा प्रवीण हा नेहरू नगर येथील शाळेत शिकत होता. त्या रोज मुलाला स्कूटरवरून शाळेत सोडायला जात असत. मंगळवारी नेहमीप्रमाणे सकाळी पावणेसातच्या सुमारास कविता मुलाला शाळेत सोडायला निघाल्या. सकाळी ७ च्या सुमारास कुर्ला नेहरू नगर येथील एस. जी. बर्वे मार्गावर एका भरधाव डंपरची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक लागली. या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने लगेच त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. पण तेथे दोघांचा मृत्यू झाला.
या अपघाताने सिंगाडिया कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. याप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी अपघात करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपरचालक रिझवान रेहमान (३२) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तो चेंबूरचा रहिवासी असल्याचे तपासात समोर येताच त्याचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्यात आली.