Join us  

"शिवसेनेसाठी दुर्दैवी... एकनाथ शिंदेंकडे उमेदवार नसल्यानेच गोविंदाला पक्षात घेतले"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 7:00 PM

शिवजयंतीनिमित्त मी शिवसेनेत प्रवेश करतोय. माझा १४ वर्षाचा वनवास संपला असं म्हणत गोविंदानं त्यांची भावना व्यक्त केली

मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारांची घोषणा होत असतानाच अनेक पक्षप्रवेशही होताना दिसत आहेत. निवडणुकांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना सर्वात पिछाडीवर दिसत आहे. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटला नाही. त्यामुळे, आगामी निवडणुकीत महायुतीच्या कोणत्या खासदाराचं तिकीट कापलं जाईल, याचीही चर्चा होत आहे. त्यातच, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता गोविंदा आहुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे 

शिवजयंतीनिमित्त मी शिवसेनेत प्रवेश करतोय. माझा १४ वर्षाचा वनवास संपला असं म्हणत गोविंदानं त्यांची भावना व्यक्त केली. अभिनेता गोविंदा म्हणाले की, मी २००४ ते २००९ सुरुवातीला राजकारणात होतो. बाहेर पडल्यावर कदाचित मी पुन्हा राजकारणात दिसणार नाही असं वाटलं. २०१० ते २०२४ या १४ वर्षांच्या वनवासानंतर जिथं रामराज्य आहे. त्याच पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत आलोय. आपल्या सर्वांच्या मनापासून शुभेच्छा आहे. मी प्रामाणिकपणे माझ्यावरील जबाबदारी पार पाडेन असं त्यांनी सांगितले. दरम्यान, गोविंदांना मुंबईतील अमोल किर्तीकर यांच्याविरुद्ध मैदानात उतरवण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळेच, आज त्यांचा घाईघाईत पक्षप्रवेश झाला आहे. त्यावरुन, आता महाविकास आघाडीचे नेतेमंडळी शिंदेंवर टीका करत आहेत. आमदार अनिल देशमुख यांनीही शिंदेंच्या शिवसेनेसाठी हे दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. 

"गोविंदा हे काँग्रेसचे खासदार होते हे सगळ्यांनाच माहीत आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच त्यांच्या पक्षाची स्थापना केली आहे. मात्र, निवडणुकीसाठी त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, म्हणून ते सिनेसृष्टीतील लोकांना आणून तिकीट देत आहेत, हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे दुर्दैव आहे.", अशा शब्दात गोविंदा यांच्या शिवसेना प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार अनिल देशमुख यांनी टीका केली. 

प्रवेशानंतर काय म्हणाले गोविंदा

शिवसेनेतील प्रवेशानंतर गोविंदांने पत्रकारांशी संवाद साधला. तसेच, राजकीय पुनरागमनावरही भाष्य केलं. ''गेल्या १४-१५ वर्षापासून मी राजकारणापासून लांब झालो होतो. शिवसेनेकडून मला मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे मी पार पाडेन. विरारमधून बाहेर पडलेल्या युवकाचं आज जगभरात नाव झालं आहे. सिनेतारकांना जगात मान देणारी ही भूमी आहे. कला आणि संस्कृती या विषयात मला काम करायचं आहे. आम्ही जी मुंबई बघायचो तेव्हापासून आता जास्त सुंदर आणि प्रगतीशील दिसतेय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मुंबईच्या सौंदर्यात भर पडली आहे. सुशोभिकरणाची कामे, विकासाची कामे सुरू आहेत. माझ्यावर बाळासाहेब ठाकरेंची कृपा कायम राहिली,'' अशी आठवणही गोविंदा यांनी पक्षप्रवेशावेळी काढली. 

मुख्यमंत्री शिंदेंकडून स्वागत

मुंबईत होत असलेल्या विकासकामांचा प्रभाव गोविंदा यांच्यावर पडला. महाराष्ट्रासह देशभरात विकासकामे सुरू आहेत. त्यातून सकारात्मक भावनेतून गोविंदा हे आपल्यासोबत आलेत. फिल्म इंडस्ट्री ही खूप मोठी आहे. लाखो लोक त्यावर अवलंबून आहेत. या फिल्म इंडस्ट्रीसाठी गोविंदा यांना काम करायचं आहे. सरकार आणि फिल्म इंडस्ट्री यांच्यातील दुवा म्हणून गोविंदा काम करतील. कुठल्याही अटी-शर्थीशिवाय ते शिवसेनेत प्रवेश करतात, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

टॅग्स :एकनाथ शिंदेअनिल देशमुखशिवसेनागोविंदा