तीन हेरिटेज वास्तुंना युनेस्कोचा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 04:29 AM2019-10-16T04:29:30+5:302019-10-16T04:29:46+5:30

मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा : पाच देशांतील १६ वास्तुंचा गौरव

UNESCO Award for Three Heritage Buildings | तीन हेरिटेज वास्तुंना युनेस्कोचा पुरस्कार

तीन हेरिटेज वास्तुंना युनेस्कोचा पुरस्कार

googlenewsNext

मुंबई : मुंबईतील फ्लोरा फाउंटन, नेसेट एलियाहू सिनागॉग, अवर लेडी आॅफ ग्लोरी चर्च अशा तीन ऐतिहासिक व हेरिटेज वास्तूंना युनेस्कोचा यंदाचा एशिया-पॅसिफिक पुरस्कार जाहीर झाला आहे.


सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन व संवर्धनासाठी युनेस्कोकडून दरवर्षी पुरस्कार दिला जातो. मेरिट या कॅटगरीत नेसेट एलियाहू सिनागॉग व आवर लेडी आॅफ ग्लोरी चर्च या वास्तूंना पुरस्कार जाहीर झाला आहे. मान्यवरांच्या शिफारसीवरून फ्लोरा फाउंटने या पुरस्कारावर नाव
कोरले आहे.
या वर्षी भारत, भूतान, आॅस्ट्रेलिया, चीन आणि न्यूझीलंडमधील १६ वास्तूंना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी १४ देशांमधून ५७ वास्तूंची नोंदणी करण्यात आली होती, त्यातून या १६ वास्तू निवडण्यात आल्या आहेत.
वास्तू वारसा तज्ज्ञ चेतन रायकर म्हणाले की, मुंबई शहराला तीन युनेस्कोचा पुरस्कार जाहीर झाला, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. जागतिक स्तरावरचे पुरस्कार आपल्या हेरिटेज वास्तूला मिळतात. म्हणजे आपले हेरिटेज संदर्भातले काम चांगल्या तºहेने सुरू आहे. अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेऊन, त्यातून पुरस्कार प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
हेरिटेजच्या वास्तू या आपला इतिहास दाखवितात आणि एक वेगळे सौंदर्यही देतात. या प्रकारच्या वास्तूंचे आता बांधकाम होत नाही. या वास्तू जर पाडल्या गेल्या, तर पुढील पिढीला चित्रांच्या माध्यमातून वास्तू दाखविण्याची वेळ येईल. टेक्निक आॅफ कन्स्ट्रक्शनसाठी वास्तू जतन कराव्यात. इतिहास आणि निखळ सौंदर्याचा आविष्कारासाठी वास्तू जतन करणे आवश्यक आहे.

अवर लेडी आॅफ
ग्लोरी चर्च -

भायखळा-माझगाव येथे हे चर्च आहे. शहरातील सर्वात जुन्या रोमन कॅथलिक चर्चपैकी हे एक चर्च म्हणून ओळखले जाते. ही वास्तू १६३२ साली उभारण्यात आली होती. १९११ ते १३ या वर्षांत चर्चची गॉथिक शैलीत पुनर्बांधणी करण्यात आली. चर्चच्या आतील डोम हा स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे.
फ्लोरा फाउंटन- ब्रिटिशकाळात १८६४ साली स्थापत्य आणि शिल्पकलेचा उत्तम
नमुना असलेल्या
फ्लोरा फाउंटनची उभारणी करण्यात आली. कारंजे, रोमन देवता, भारतीय उद्योगधंदे, झाडे, फळे, धान्य यांच्या प्रतिकृतीसह युवतीचा पुतळा अशा प्रकारचे हे शिल्प आहे. सर हेन्री बेरटल आणि एडवर्ड फ्रेर यांच्या सन्मानार्थ ही वास्तू तयार करण्यात आली आहे. वास्तुविशारद नरिमन शॉ यांनी या वास्तूचा आराखडा तयार केला होता. ही वास्तू पोर्ट लँड दगडापासून बनविण्यात आली आहे.
नेसेट एलियाहू सिनागॉग -
फोर्ट येथील नेसेट एलियाहू सिनागॉग हे यहुदींचे प्रार्थनास्थळ आहे. १८८४ साली ही वास्तू उभारण्यात आली. या वास्तूचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले.

Web Title: UNESCO Award for Three Heritage Buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.