नाइटलाइफमुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, महापौर किशोरी पेडणेकर यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 04:18 AM2020-01-21T04:18:44+5:302020-01-21T04:20:16+5:30

मुंबई शहर कधी झोपत नाही. जागतिक दर्जाचे हे शहर घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे सतत धावत असते. अशा या शहरातील सर्व व्यवहार २४ तास सुरू ठेवण्याची संकल्पना पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आणली आहे.

Unemployment Questions will Solve due to Nightlife - Kishori Pednekar | नाइटलाइफमुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, महापौर किशोरी पेडणेकर यांचे मत

नाइटलाइफमुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, महापौर किशोरी पेडणेकर यांचे मत

Next

- शेफाली परब- पंडित

मुंबई : असे म्हणतात की, मुंबई शहर कधी झोपत नाही. जागतिक दर्जाचे हे शहर घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे सतत धावत असते. अशा या शहरातील सर्व व्यवहार २४ तास सुरू ठेवण्याची संकल्पना पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आणली आहे. त्यानुसार, पुढच्या आठवड्यापासून मुंबईतील काही अनिवासी भागांमध्ये नाइटलाइफला सुरुवात होणार आहे. येथील हॉटेल, मॉल्स, दुकाने असे व्यवहार दररोज दिवस-रात्र सुरू राहणार आहेत. मात्र, या प्रयोगाला भाजपने तीव्र विरोध केला आहे, तर पोलीस यंत्रणेवर ताण येईल, असे मत गृहमंत्र्यांनीच व्यक्त केले आहे. मुंबई नाइटलाइफसाठी तयार आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी केलेली ही बातचीत...


नाइटलाइफसाठी शहर तयार आहे का?
त्यात तयार होण्यासारखे काय आहे? असेही मुंबईत रात्री दोन वाजेपर्यंत व्यवहार सुरूच असतात. रात्री रेल्वे २-३ तास बंद असते, तेवढ्यापुरती मुंबई थांबते. पहाटे चारपासून पुन्हा दूध विके्रेते, वृत्तपत्र विक्रेते यांची धावपळ सुरू होते. गेल्या काही वर्षांत कॉर्पोरेट हाउसेस वाढल्यामुळे अनेक भागांमध्ये १४-१८ तास कार्यालये सुरू असतात. याउलट नाइटलाइफमुळे रात्री काम करणाऱ्यांची गैरसोय दूर होईल. रोजगाराचे प्रमाण वाढेल,दिवसा शिक्षण घेणा-या गरजवंतांना रात्री हॉटेल, मॉल्समध्ये काम करता येईल. मुख्य म्हणजे बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल. प्रत्येक हाताला काम मिळेल.

गृहमंत्र्यांनीच याबाबत साशंकता व्यक्त केली आहे?
याबाबत मला काही माहिती आलेली नाही, परंतु नाइटलाइफवर गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. सर्व बाबींचा विचार करून मगच यावर अंमल होणार आहे.

कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही का?
मुंबईत पोलिसांची गस्त वाढविता येईल. नाइटलाइफमुळे यंत्रणेवर ताण पडत आहे, असे वाटत असल्यास पोलीस भरती करता येईल. ज्या मॉल्स, दुकान, हॉटेल मालकांना २४ तास आपला व्यवसाय सुरू ठेवायचा आहे, तेदेखील आपल्या व्यवसायाच्या सुरक्षेची खबरदारी घेतीलच ना.

महापालिकेची तयारी कशा प्रकारे सुरू आहे?
नाइटलाइफ अंतर्गत रात्रीचे व्यवहार सुरू ठेवण्यास इच्छुक मॉल्स, हॉटेल, दुकानांचा आढावा घेण्यात येत आहे. पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी किती अतिरिक्त सुरक्षेची गरज पडेल, याची चाचपणी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. स्वत:चे प्रवेशद्वार, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या मॉल आणि चित्रपटगृहांसारख्या आस्थापनांमधील दुकाने, उपाहारगृहे २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे. दुकाने, हॉटेल, मॉल रात्रभर सुरू राहणार असल्याने, परवान्यांपोटी राज्य सरकार आणि महापालिकेच्या महसुलात चांगली वाढ होईल.

भाजपकडून मात्र तीव्र विरोध सुरू आहे, त्याचे काय?
चांगल्या कामांना नेहमीच विरोध होत असतो, पण कोण काय बोलतंय, याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपले काम करीत राहावे. जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात नाइटलाइफमुळे पर्यटन वाढेल. मुंबईत हजारो नोकरदार आपल्या आॅफिसमधून रात्री उशिरा घराकडे परततात. शिक्षणासाठी घराबाहेर असलेली मुले, कॉल सेंटरचे कर्मचारी, पोलीस आदी रात्री उशिराच नोकरीवरून घरी जातात. त्यांना भूक लागल्यास रात्री-अपरात्री कुठे काहीही मिळत नाही. अशा वेळेस जर हॉटेले खुली असतील, तर त्यांचे पोट भरू शकते.

Web Title: Unemployment Questions will Solve due to Nightlife - Kishori Pednekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.