Join us  

अंडरस्टँडिंग कशासाठी?; भाजपचा शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 1:12 AM

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही समित्यांच्या बैठका, सभा आणि निवडणुका घेण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा काळातही स्थायी समितीची बैठक नियमित होत असल्याने पहारेकऱ्यांनी भुवया उंचावल्या आहेत. आणीबाणीच्या काळात आवश्यक नसताना ही ‘अंडरस्टँडिंग’ कोणासाठी? असा सवाल भाजपने केला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्वांना घरातूनच काम करण्याची सक्ती केली आहे. तसेच पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यास राज्य सरकारने मनाई केली आहे. मात्र या काळातही महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक बैठक २७ मार्च रोजी पार पडली. या बैठकीवर भाजपने बहिष्कार टाकला होता.

पावसाळी पूर्व कामांसाठी अशी तातडीची बैठक घेणे शक्य असल्याचा युक्तिवाद पालिका प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र या बैठकीत एखादा आरोग्याचा विषय सोडला तर काहीच महत्त्वाचा अजेंडा नसताना स्थायी समितीची बैठक घेण्याचा अट्टाहास का? असा सवाल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

३१ मार्च रोजी स्थायी समितीची पुन्हा बैठक आहे. मात्र संपूर्ण जग कोरोनाच्या विरोधात लढत असताना पालिकेच्या स्टँडिंग मध्ये कसले अंडरस्टँडिंग सुरू आहे ? असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :आशीष शेलारउद्धव ठाकरेशिवसेना