Join us

भुयारी मेट्रो ३ : चर्चगेट ते हुतात्मा चौक ६४८ मीटर लांब भुयार पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 18:13 IST

Mumbai Metro : कुलाबा-वांद्रे-सीप्झ

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे काम वेगाने सुरु असून, लॉक डाऊन शिथिल होत असतानाच या कामाने आणखी वेग पकडला आहे. शुक्रवारी चर्चगेट ते हुतात्मा चौक हा ६४८ मीटर लांब ३४ वा भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला.

५०६ रिंग्जच्या सहाय्याने २९२ दिवसात हे अप लाईन मार्गाचे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले. सूर्या-१ या टनेल बोअरिंग मशीनद्वारे हे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली.

हुतात्मा चौक या मेट्रो-३ मार्गावरील स्थानकामुळे चर्चगेट रेल्वे स्थानक, काही देशांचे दूतावास, उच्च न्यायालय, बँकांचे व वित्तीय संस्थांची मुख्यालये, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, बलार्ड इस्टेट, इस्पितळे, महाविद्यालये, वानखडे व ब्रेबॉर्न स्टेडियम, जहांगीर आर्ट गॅलरी, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, एशीयाटिक लायब्ररी, गेट वे ऑफ इंडिया, व विविध उपहारगृहे इत्यादी स्थळांना पोहचणे अधिक सुलभ होईल.

----------------------

हुतात्मा चौक स्थानकाचे एकूण ५३ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर पॅकेज-१ मध्ये ८१ टक्के भुयारीकरण आणि ७० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. मेट्रो-३ प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ८९ टक्के भुयारीकरण व ६१ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.

- रणजित सिंह, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन 

टॅग्स :मेट्रोमुंबईसरकार