अनधिकृतपणे ज्वलनशील पदार्थांचा साठा करणाऱ्या ठिकाणांवर धाड टाकणार - बीएमसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 22:06 IST2021-03-02T22:06:06+5:302021-03-02T22:06:46+5:30
महत्वपूर्ण बैठकीत महापालिकेचा निर्णय

अनधिकृतपणे ज्वलनशील पदार्थांचा साठा करणाऱ्या ठिकाणांवर धाड टाकणार - बीएमसी
मुंबई - आगीच्या दुर्घटना मुंबईत वाढत असल्याने अनधिकृतपणे गॅस सिलेंडर, ज्वलनशील पदार्थांचा साठा करणाऱ्या ठिकाणांवर संयुक्त पथकामार्फत लवकरच धाड टाकण्यात येणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामधील पेंग्विन कक्षात मंगळवारी घेतलेल्या आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
वर्सोवा, यारी रोड येथील एका गॅस सिलेंडरच्या गोदामाला व गोवंडी मंडळ येथे आग लागल्यानंतर संपूर्ण मुंबईत कारवाई करण्यापूर्वी संबंधित यंत्रणांची बैठक घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले होते. त्यानुसार महापौरांच्या अध्यक्षतेखाली आग प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यासंदर्भात संबंधित यंत्रणांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी ( मुंबई उपनगरे) मिलिंद बोरीकर, अप्पर जिल्हाधिकारी (मुंबई शहर) अरुण अभंग, अप्पर जिल्हाधिकारी (पश्चिम उपनगरे) उद्धव घुगे, अप्पर जिल्हाधिकारी (पूर्व उपनगरे) तेजूसिंग पवार, पोलीस उपायुक्त चैतन्य एस., अग्निशमन अधिकारी (प्रभारी) हेमंत परब उपस्थित होते.
मुंबईमध्ये आग लागल्यानंतर ही जागा जिल्हाधिकारी, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या अखत्यारीत असल्याचे सबब देत प्रभावीपणे अवैध ठिकाणांवर कारवाई होत नव्हती. यामुळे अवैध माफियांचे फोफावत असून ते अवैध सिलेंडरचा व ज्वलनशील पदार्थांचा साठा करून ठेवतात. यामुळे आगीच्या दुर्घटनांना सामोरे जावे लागत असल्याची नाराजी महापौरांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, अग्निशमन दल, मुंबई महापालिकेचा संबंधित विभाग, पोलिसांचे संयुक्त पथक नेमून महापौरांच्या नेतृत्वात संपूर्ण मुंबईत अवैध साठा असलेल्या ठिकाणांवर धाड टाकण्यात येणार आहे.
अवैध माफियांवर कारवाईचा धाक निर्माण होत नाही, तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील. त्यानंतर संयुक्त पथकाद्वारे वेळोवेळी कारवाई करण्यात येईल. - किशोरी पेडणेकर, मुंबई महापौर