रुंदीकरणाला अनधिकृत झोपड्यांचा अडथळा; पोयसर नदी रुंदीकरण पालिकेकडून प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 10:16 AM2024-03-30T10:16:42+5:302024-03-30T10:17:21+5:30

कांदिवली पश्चिमेकडील लालजीपाडा येथील पोयसर नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम पालिकेकडून हाती घेतले जाणार आहे.

unauthorized slums obstruct widening efforts by poysar river widening corporationin kandivali mumbai | रुंदीकरणाला अनधिकृत झोपड्यांचा अडथळा; पोयसर नदी रुंदीकरण पालिकेकडून प्रयत्न

रुंदीकरणाला अनधिकृत झोपड्यांचा अडथळा; पोयसर नदी रुंदीकरण पालिकेकडून प्रयत्न

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील लालजीपाडा येथील पोयसर नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम पालिकेकडून हाती घेतले जाणार आहे. पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने हा निर्णय घेतला असून, यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. यावर ३१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दरम्यान, या नदीच्या काठावरील अनधिकृत बांधकामे या रुंदीकरणात अडथळे ठरत असून, आर दक्षिण विभागाच्या निरीक्षणाखाली ही अनधिकृत बांधकामे हटविण्याची प्रक्रिया पालिकेकडून सुरू आहे. या परिसरात हनुमाननगर, बिहारी टेकडी आणि पोयसर नदीच्या ब शाखेचा समावेश आहे. अनधिकृत बांधकामे हटविल्यानंतरच पालिकेला ब शाखेच्या रुंदीकरणाची प्रक्रिया करता येणार आहे.

कांदिवली पश्चिम येथे डहाणूकरवाडीजवळ पोयसर नदी दोन शाखांमध्ये म्हणजे अ व ब शाखा अशी विभागण्यात येते. ‘अ’ शाखेचे ७५ टक्के रुंदीकरण व खोलीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. ‘ब’ शाखेचे रुंदीकरण व खोलीकरण अद्याप झालेले नाही. ‘ब’ शाखेची सध्याची रुंदी सहा ते आठ मीटर असून, सल्लागाराने सुचविल्यानुसार २० मीटर रुंद करणे अपेक्षित आहे. तसेच पोयसर नदीच्या ‘ब’ शाखेतून नाल्याचा गाळ काढण्यासाठी येथे सहा मीटर रुंद पोहोच रस्त्याचे काम केले जाणार आहे. कांदिवली मालाड परिसर मिळून एकूण या परिसरात २ हजारांहून अधिक झोपड्या आहेत.

तांत्रिक अडचणी-

१) कांदिवली पश्चिम येथील डहाणूकरवाडी क्षेत्रातून वाहणाऱ्या पोयसर नदीचा उगम संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य क्षेत्रातील डोंगररांगांमधून होतो आणि ही नदी मालाड पूर्व येथील क्रांतीनगर झोपडपट्टीतून नगरात प्रवेश करते. 

२)  यामधील ९. २ किमीचा नदीलगतचा प्रवाह पालिकेच्या हद्दीत येत असून, तो कांदिवली पश्चिम परिसरातील डहाणूकरवाडीत वसलेल्या वस्तीमुळे दोन प्रवाहात विभागला जातो. 

३)  या  दोन्ही प्रवाह एकत्र येऊन मालाड (पश्चिम) मध्ये मार्वे खाडीला जाऊन मिळतात. यापैकी एक प्रवाह नदीपात्रातील झोपड्यांच्या अतिक्रमणामुळे अरुंद झाला होता. पुलामुळे पावसाच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा निर्माण होतो. डहाणूकरवाडी परिसरातील रहिवाशांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागते.

४)  येथील झोपडीधारकांच्या विविध मागण्या, तांत्रिक व प्रशासकीय अडचणी यामुळे प्रवाह पात्रातील झोपड्या हटविणे शक्य होत नव्हते. त्यामुळे पर्जन्य जलवाहिन्या विभागालाही याठिकाणी नदीपात्राचे नियोजित रुंदीकरण करता आले नाही.

Web Title: unauthorized slums obstruct widening efforts by poysar river widening corporationin kandivali mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.