अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

By Admin | Updated: September 26, 2016 02:37 IST2016-09-26T02:37:48+5:302016-09-26T02:37:48+5:30

के-पश्चिम विभागातील ना. सी. फडके मार्गावरील अनधिकृत बांधकामांमुळे रस्ता रुंदीकरणासह पर्जन्यजल वाहिन्यांची कामे रखडलेली होती.

Unauthorized constructions collapse | अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

मुंबई : के-पश्चिम विभागातील ना. सी. फडके मार्गावरील अनधिकृत बांधकामांमुळे रस्ता रुंदीकरणासह पर्जन्यजल वाहिन्यांची कामे रखडलेली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येण्याबरोबरच पर्जन्यजल वाहिन्यांच्या कामातही अडथळा येत असल्याने या भागात पावसाचे पाणी साचण्याची शक्यता वाढली होती. परिणामी, उपायुक्त किरण आचरेकर यांनी या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत आतापर्यंत ७८ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेत.
विभागाचे सहायक आयुक्त पराग मसुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ना. सी. फडके मार्गावरील अनधिकृत बांधकामांवर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सलग दोन दिवस कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान एकूण ६० अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत १८ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेत. यानुसार ना. सी. फडके मार्गावर असणाऱ्या ९८ अनधिकृत बांधकामांपैकी ७८ बांधकामे तोडण्यात आली आहेत. ना. सी. फडके मार्गावरील कारवाईसाठी पोलीस दलाच्या अखत्यारीतील डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे व त्यांच्या ३४ जणांच्या चमूचे सहकार्य महापालिकेच्या पथकाला लाभले. या कारवाईसाठी २ जेसीबी, ३ डम्पर व २ ट्रक वापरण्यात आले. या कारवाईमुळे ना. सी. फडके मार्गाच्या रुंदीकरणास तसेच रुंदीकरणाच्या खाली पर्जन्यजल वाहिन्यांची बांधकामे करण्यास मदत होणार आहे.

Web Title: Unauthorized constructions collapse