'उमेद मॉल' उभारणार, २५ लाख 'लखपती दीदी' करण्याचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 08:01 IST2025-02-12T08:01:20+5:302025-02-12T08:01:37+5:30
‘उमेद’च्या माध्यमातून ६० लाखांपेक्षा अधिक कुटुंब आर्थिक प्रगती करत आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

'उमेद मॉल' उभारणार, २५ लाख 'लखपती दीदी' करण्याचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई - राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्रीचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यांत टप्प्याटप्प्याने ‘उमेद मॉल’ तयार करणार आहोत. राज्यात आगामी कालावधीत एक कोटी ‘लखपती दीदी’ करण्याचा संकल्प आहे. सध्या राज्यात १८ लाख ‘लखपती दीदी’ असून, मार्चपर्यंत त्यांची संख्या पंचवीस लाख करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
६० लाखांपेक्षा अधिक कुटुंबांची आर्थिक प्रगती
बांद्रा-कुर्ला संकुल येथे ग्रामविकास विभागाच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मंगळवारी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश सागर, मुख्य परिचालन अधिकारी परमेश्वर राऊत यांच्यासह राज्यभरातून बचत गटांच्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. हे प्रदर्शन २३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
फडणवीस म्हणाले, की ‘उमेद’ अभियानाच्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे. ‘उमेद’च्या माध्यमातून महालक्ष्मी सरस हा गेली २१ वर्षे अविरत सुरू असलेला महिला बचत गटांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम झाला आहे. ‘उमेद’च्या माध्यमातून ६० लाखांपेक्षा अधिक कुटुंब आर्थिक प्रगती करत आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.