Join us

मुंबई महापालिकेवर १ जुलैला उद्धव ठाकरे गट काढणार मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 08:33 IST

ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे माजी नगरसेवकांची बैठक घेतली.

मुंबई : महापालिका विसर्जित होऊन एक वर्ष लोटले तरी निवडणुका घेण्याची हिंमत नाही. सरकारकडून पालिकेच्या तिजोरीची लूट सुरू आहे. हा जनतेचा पैसा असून, त्याचा हिशोब द्यावाच लागेल. या भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना १ जुलै रोजी महापालिकेवर विराट मोर्चा काढणार असून, आदित्य ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करेल, अशी घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली.

ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे  माजी नगरसेवकांची बैठक घेतली. ते म्हणाले, “एकेकाळी मुंबई महापालिका साडेसहाशे कोटी रुपयांच्या तुटीत होती. पण, गेल्या काही वर्षात आमच्या कारभारात पालिकेकडे ९२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी निर्माण झाल्या. ठेवीतून आतापर्यंत या सरकारने सात ते आठ हजार कोटी उधळले आहेत. या सगळ्या भ्रष्टाचाराचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा आहे.

फडणवीस नावडाबाई उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्धवटराव म्हणून केलेल्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, मोदींनी लस तयार करण्याच्या वक्तव्यावर मी टीका केली तर मला म्हणाले अर्धवटराव. मला अर्धवटराव म्हणत असतील तर ते दिल्लीश्वरांचे आवडाबाई आहेत का? पण आता ते नावडाबाई झाले आहेत.

दरोडा टाकणाऱ्यांचा मोर्चामहापालिकेवर दरोडा टाकणाऱ्यांनीच मोर्चा काढावा? त्यांनी दरोडा टाकला. त्यातील हजारो कोटी रुपये कुठे गेले? आता आम्ही महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी एसआयटी नेमल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दूध का दूध पानी का पानी होईल.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

चोराच्या उलट्या बोंबामहापालिकेवर ठाकरेंनी मोर्चा काढणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. कॅगच्या अहवालाने महापालिकेतील घोटाळ्याचे सुतोवाच केले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमली आहे. एसआयटी चौकशीत अनेकांचे बुरखे फाटतील, काही जण तर नागडे होतील.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.

टॅग्स :उद्धव ठाकरे