Join us

सुशिक्षित बेरोजगारांनी सरकारच्या दारात ‘पकोडे’ तळायचे की मंत्रालयात घुसून आत्महत्या करायची ? - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 08:24 IST

उद्धव ठाकरेंनी सामना संपादकीयच्या माध्यमातून मंत्रालयात होणा-या आत्महत्यांवरुन सरकारवर ताशेरे ओढले आहेत

मुंबई - सुशिक्षित बेरोजगारांनी सरकारच्या दारात ‘पकोडे’ तळायचे की मंत्रालयात घुसून आत्महत्या करायची याचे उत्तर मिळायला हवे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सामना संपादकीयच्या माध्यमातून मंत्रालयात होणा-या आत्महत्यांवरुन त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, बेरोजगार रस्त्यावर उतरले आहेत. बेरोजगारी उरली नाही व ज्यांना रोजगार नाही त्यांनी रस्त्यावर ‘पकोडे’ तळावेत असे पंतप्रधान मोदी सांगत आहेत, मात्र तिकडे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी पुणे, संभाजीनगर आणि नागपूरसारख्या भागांत तीव्र आंदोलन सुरू केले आहे. सरकारने नोकरभरतीवर बंदी आणून बेरोजगारांच्या संख्येत वाढ केली आहे. या सगळ्य़ा सुशिक्षित बेरोजगारांनी सरकारच्या दारात ‘पकोडे’ तळायचे की मंत्रालयात घुसून आत्महत्या करायची याचे उत्तर मिळायला हवे असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत. 

हे राज्य कल्याणकारी व्हावे, मराठीजन, शेतकरी, कष्टकरीजनांचे भले व्हावे म्हणून राज्याचा मंगल कलश मंत्रालयात आणला. मंत्रालयासह महाराष्ट्राची सध्याची अवस्था पाहता मंगल कलशालाही पाय फुटतील व अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनखाली राज्याच्या आशाआकांक्षांचा हा मंगल कलश आत्महत्या करील अशी भीती आम्हाला वाटते. मंत्रालयात जनतेला रयतेचे राज्य असल्याचा अनुभव यायला हवा. मात्र सध्या विपरीतच घडत आहे. जिवंत माणसे मंत्रालयात येतात आणि तेथे जीव देतात. मंत्रालयावर निरपराध्यांच्या रक्ताचे शिंतोडे उडत आहेत व आत्महत्या करणाऱयांच्या किंकाळय़ा घुमत आहेत. मंत्रालय म्हणावे की स्मशान, अशी भयंकर स्थिती निर्माण झाली आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

महाराष्ट्राचे मंत्रालय हे जणू स्मशान झाले आहे. मंत्रालय हे राज्यातील जनतेच्या आशाआकांक्षांचे, भावनांचे प्रतिबिंब असते. मंत्रालयाच्या दर्शनी भागात छत्रपती शिवरायांची तसबीर आहे, तर सहाव्या मजल्यावर म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आहे. हेच महाराष्ट्राचे मंत्रालय आता जनतेच्या आशाआकांक्षांचे थडगे झाले आहे व मंत्रालयातील अनेक दालनांत निर्जीव व भावनाशून्य पुतळेच खुर्च्यांवर बसवले आहेत की काय असा भास निर्माण झाला आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघात तरुणांसाठी ‘सेल्फी पॉइंट’ निर्माण केले आहेत; पण मंत्रालय सध्या ‘सुसाईड पॉइंट’ म्हणजे आत्महत्या करण्याचे ठिकाण झाले आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 

गेल्या काही दिवसांत आत्महत्यांचे सत्र मंत्रालयात सुरू आहे. धर्मा पाटील या शेतकऱ्याने मंत्रालयात आत्महत्या केली. धर्मा आजोबांचे बारावे-तेरावे होत नाही तोच गुरुवारी हर्षल सुरेश रावते या पंचेचाळीस वर्षांच्या तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली व मरण पत्करले. धर्मा पाटील व हर्षल रावतेच्या आत्महत्येची कारणे वेगळी आहेत. रावते हा तुरुंगातून रजेवर सुटलेला कैदी होता व त्यास जन्मठेपेची शिक्षा लागली होती. पण त्याने शेवटी जीवनाचा अंत करून घेण्यासाठी मंत्रालयाचीच जागा का निवडली? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. 

महाराष्ट्रातील मंत्रालयात या आत्महत्या म्हणजे सरकार निर्दय व नाकाम झाल्याचा पुरावा आहे काय? लोकोपयोगी कारभार तर दूर राहिला, मंत्रालयात सामान्य जनतेची दाद-फिर्याद, अन्याय किमान ऐकून घेण्याचीही संवेदनशीलता राहिलेली नाही. म्हणूनच जिवंत माणसे तेथे घुसून मरण पत्करीत आहेत का? राज्यातील कानाकोपऱयात, घरोघरी अस्वस्थता आहे व पिचलेली माणसे आत्महत्या करीत आहेत. हे चित्र महाराष्ट्राला शोभणारे नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना