Join us  

घोडेबाजारवाल्यांच्या ‘बुलेट’ मस्तीला प्रोत्साहन द्यायचे नाही, उद्धव ठाकरेंची भाजपावर सणसणीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 9:44 AM

आमचे राजकारण खुर्च्यांचे आणि स्वार्थाचे नाही, तर महाराष्ट्रहिताचे आहे. साथ द्यायची ती उघडपणे आणि लाथ घालायची तीदेखील उघडपणे. आम्ही काय आहोत हे येणारा काळच ठरवील. सीमोल्लंघन झालेच आहे. ज्यांना ते दिसले नाही त्यांना पोटदुखीचा त्रास आहे. त्यांनी वेळेत उपचार करून घ्यावेत! असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून सांगितलं आहे.

मुंबई -  आमचे सीमोल्लंघन हे जनतेच्या भावनांचा सन्मान करणारे असते. आम्ही मुहूर्ताच्या तारखा ठरवून व समोरच्यांच्या कुंडल्या समोर ठेवून निर्णय घेत नाही आणि राजकारण करीत नाही. कारण आमचे राजकारण खुर्च्यांचे आणि स्वार्थाचे नाही, तर महाराष्ट्रहिताचे आहे. साथ द्यायची ती उघडपणे आणि लाथ घालायची तीदेखील उघडपणे. आम्ही काय आहोत हे येणारा काळच ठरवील. सीमोल्लंघन झालेच आहे. ज्यांना ते दिसले नाही त्यांना पोटदुखीचा त्रास आहे. त्यांनी वेळेत उपचार करून घ्यावेत! असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून सांगितलं आहे.  याक्षणी तरी आम्हाला महाराष्ट्रात राजकीय अराजक निर्माण करून घोडेबाजारवाल्यांच्या ‘बुलेट’ मस्तीला प्रोत्साहन द्यायचे नाही. आमचे निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत. साथ द्यायची ती उघडपणे आणि लाथ घालायची तीदेखील उघडपणे. आमच्याकडे कपट, कारस्थानांना थारा नाही व जनतेला फसवून राज्य भोगण्याचे आमचे धंदे नाहीत असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.  

आम्ही आमची भूमिका सर्वच विषयांवर अत्यंत ठामपणे मांडली. त्यातून ज्या कुणाला अर्थ-अनर्थांची चिवडाचिवडी करायची असेल तर त्यांनी ती खुशाल करावी. कुणाला काय वाटते यावर आमची धोरणे ठरवली गेली असती तर शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेचा हा विजयी रथ इथपर्यंत आणताच आला नसता असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत. 

आमची बांधिलकी सर्वप्रथम लाखो निष्ठावान शिवसैनिकांशी, महाराष्ट्राच्या मर्द मऱ्हाटी जनतेशी, हिंदुत्वाशी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेशी आहे. त्यामुळे ‘सीमोल्लंघना’चे कसे काय करावे हे इतरांकडून शिकण्याची गरज नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही आज सत्तेत जरूर आहोत, पण याचा अर्थ आम्ही त्यांच्या कृपेने श्वास घेत आहोत व त्यांच्या मेहेरबानीने जगत आहोत असा नाही. राजकारणात कुणी कुणाच्या मेहेरबानीने आज तरी जगत नाही व कुणी कुणाचे उपकारही मानत नाही. चांगले काम व उपकार लक्षात ठेवून वागण्याऐवजी ‘विसरा व पुढे जा’ हेच धोरण राजकारणात आज सरसकट स्वीकारले जात आहे. तसे नसते तर लालकृष्ण आडवाणी हे भाजपचे एकेकाळचे कर्तेधर्ते श्वास गुदमरलेल्या अवस्थेत वनवासात गेले नसते आणि त्यांचे मागचे ऋण विसरून भाजपचे आजचे ‘ढोलबडवे’ पुढारी स्वबळाचे देव अंगी घुमवत नाचताना दिसले नसते अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

शिवसेनेचे सीमोल्लंघन म्हणजे भारतीय जनता पक्षाशी सत्तेत असलेले नाते तोडणे असे काहींनी स्वतःच ठरवले होते. तसे ते दसऱ्याच्या मुहूर्तावर तोडले असते तर काही पोटावळ्या पत्रकारांच्या मते सीमोल्लंघन झाले असते. हा दसऱ्याचा मुहूर्त साधला नसल्याने काहींना दसरा मेळावा निराशाजनक वगैरे वाटला असेलही, पण तो त्यांचा दृष्टिदोष मानायला हरकत नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी हाणला आहे. 

एल्फिन्स्टन रोडवरील भयंकर दुर्घटनेचे काळेकुट्ट दुःखद सावट मेळाव्यावर नक्कीच होते. ज्या बुलेट मस्तीने हे बळी बेदरकारपणे घेतले त्या मस्तीचे रंगेल चित्र भाजपच्या नाचऱ्या खासदार महोदयांनी त्याच दिवशी दाखवले. प्रेतांच्या टाळूवरचे लोणी खाणारी ही ‘बुलेट’ मस्तीची अहमदाबादी अवलाद दुर्घटनेच्या दिवशीच हातात टिपऱ्या घेऊन ‘गरबा’ खेळत होती. तिच्या चेहऱ्यावर जणू आनंदाचे भरतेच आले होते. दुर्घटनेतील मृतदेह इस्पितळाच्या शवागारात होते. नातेवाईक, आप्तजन शोकसागरात होते. सारी मुंबई या दुःखद घटनेने शोकसंतप्त असताना हे कमळ किरीट टिपऱ्या बडवत नाचत होते. इतके निर्दय होऊन मेळाव्यात ‘दाणदाण’ उत्साहाचे कारंजे उडवणे आम्हाला कधीच जमणार नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा