Join us  

यशवंत सिन्हा यांनी भाजपातील अनेकांच्या ‘मनातील बात’ केली व्यक्त - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 7:46 AM

यशवंत सिन्हा यांनी भाजपातील अनेकांच्या ‘मनातील बात’ व्यक्त केली आहे-उद्धव ठाकरे

मुंबई - अटलबिहार वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती सांभाळणारे आणि मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून भाजपाविरोधात सातत्याने टीकेचा सूर आवळणारे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अखेर भाजपालाच राम राम ठोकला. देशात लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोप करीत भाजपचा त्याग करून राजकारण संन्यास घेतला आहे. यावरुन, यशवंत सिन्हा यांनी भाजपातील अनेकांच्या ‘मनातील बात’ व्यक्त केली आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे.

शिवाय, ''भाजपात सध्या जी धुसफूस सुरू आहे त्या खदखदणाऱ्या वाफेचे झाकण उडविण्याचे काम यशवंत सिन्हा यांनी नक्कीच केले आहे. वाफेने झाकण उडाले असले तरी खदखदणारे पाणी बाहेर पडेल काय ही शंकाच आहे'',असेही सांगत उद्धव ठाकरे भाजपावर टीका केली आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय ?यशवंत सिन्हा यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. सिन्हा यांनी बंड केले व त्या बंडामुळे भारतीय जनता पक्षात पडझड किंवा खळबळ माजेल अशातला भाग नाही. डॉ. सुब्रमण्यम स्वामी म्हणतात त्याप्रमाणे सिन्हा यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाला काहीच फरक पडणार नाही हे खरेच आहे. सिन्हा हे काही लोकनेते नाहीत व त्यांना पक्षातही समर्थन नाही. पदे मिळाली नाहीत म्हणून गुदमरलेल्या चारेक असंतुष्ट लोकांनी एक मंच स्थापन केला व त्या मंचाचे नेते म्हणून सिन्हा गेले काही महिने सरकारी धोरणांवर टीका करीत आहेत. सिन्हा यांनी वाजपेयींच्या काळात अर्थ व संरक्षण खात्याची धुरा सांभाळली. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना प्रसिद्धी मिळत गेली. नोटाबंदी, जीएसटी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सिन्हा यांनी मोदी सरकारला धारेवर धरले. गेल्या आठवड्य़ात देशात जी अचानक चलनटंचाई झाली त्यासाठी सरकारच्या गैरव्यवस्थापनाला त्यांनी जबाबदार धरले होते. नोटा छपाईचा संबंध देशाच्या जीडीपीशी असतो. याबाबत सरकार स्पष्टीकरण देऊ शकलेले नाही असाही आरोप त्यांनी केला होता. 

सिन्हा यांनी देशाच्या कोसळत्या आर्थिक धोरणांसंदर्भात जे मूलभूत प्रश्न विचारले त्यावर भाजपला उत्तरे देता आली नाहीत. शेतकऱ्यांना त्यांच्या मालास किमान समर्थन मूल्य मिळावे यासाठी त्यांनी आंदोलन केले व विदर्भात नाना पटोलेंसारखे भाजप नेते सिन्हांच्या बंडाळीचे भोई झाले. शत्रुघ्न सिन्हाही यशवंत सिन्हांची पाठराखण करीत आहेत, पण त्यामुळे भाजपास मोठा फरक पडणार नाही. तरीही भाजपात सध्या जी धुसफूस सुरू आहे त्या खदखदणाऱ्या वाफेचे झाकण उडविण्याचे काम यशवंत सिन्हा यांनी नक्कीच केले आहे. वाफेने झाकण उडाले असले तरी खदखदणारे पाणी बाहेर पडेल काय ही शंकाच आहे. यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांचे पक्षातील योगदान मोठे आहे. आडवाणी व जोशी हे तर पक्ष संस्थापकांपैकी महत्त्वाचे मोहरे आहेत. यशवंत सिन्हा हे मूळचे संघ परिवाराचे नाहीत. ते भारतीय प्रशासकीय सेवेत होते. विदेश सचिव म्हणून ते काम करीत होते व जनता दलाच्या माध्यमातून राजकारणात आले. त्यामुळे भाजपात ते मूळ पुरुषाच्या भूमिकेत नाहीत. त्यामुळे जसा लालकृष्ण आडवाणी यांच्या बाबतीत सहानुभूती बाळगणारा मोठा वर्ग भाजपात आहे तसा यशवंत सिन्हांच्या बाबतीत नाही. पुन्हा आडवाणी यांचे मौनव्रत हादेखील तसा सूड आणि बंडाचाच एक भाग आहे. सिन्हा बोलत राहिले. 

सिन्हा यांना नव्या राजवटीत महत्त्वाचे पद मिळाले असते तर कदाचित त्यांची घुसमट झाली नसती व केंद्र सरकारच्या धोरणांचे ते कडवट समर्थक बनले असते. ३० जानेवारी २०१८ रोजी यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रीय मंचची स्थापना केली तेव्हा हा मंच राजकीय नाही, तर देशविरोधी योजना राबविणाऱ्या केंद्र सरकारविरोधात असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. आता त्यांनी देशात लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोप करीत भाजपचा त्याग करून राजकारण संन्यास घेतला आहे. अर्थात यशवंत सिन्हा यांनी भाजपातील अनेकांच्या ‘मनातील बात’ व्यक्त केली आहे. ‘‘दिल्लीतील सत्ता ही असत्य, अवडंबर व थापेबाजीच्या पायावर उभी आहे आणि भ्रमाच्या हिंदोळ्य़ावर ती झुलत ठेवली आहे. लोकांचे आवाज बंद करून पक्षाच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक खिडकी योजना अमलात आणली जात आहे. सत्य बोलणे हा देशद्रोह व दिलखुलास व्यक्त होणे हा गुन्हा ठरवला जात असून गुलामीच्या बेड्य़ा व जिभेस टाळे असे चाळे लोकशाहीच्या नावाखाली चालले आहेत,’’ असे यशवंत सिन्हांचे सांगणे आहे. इंदिरा गांधी यांच्याविरोधात प्रथम आवाज उठवणारे चंद्रशेखर, मोहन धारिया व कृष्ण कांत यांचीही अशीच घुसमट झाली होती, पण सिन्हा हे बंडखोर किंवा क्रांतिकारी प्रवृत्तीचे नाहीत. त्यामुळे हे बंड नाहीच!

टॅग्स :उद्धव ठाकरेनरेंद्र मोदीयशवंत सिन्हा