Join us  

नव्या रामकथेस आवर घाला; हनुमानाची जात ठरवणाऱ्या भाजपा नेत्यांवर उद्धव ठाकरेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 7:19 AM

सध्या देशात रामभक्त हनुमानाची जाती ठरवण्यावरुन प्रचंड चर्चा रंगली आहे. राजकीय मंडळी आपापल्या परीनं हनुमानाची जात ठरवत असल्याचे दिसत आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. 

ठळक मुद्देभाजपात रामभक्त हनुमानाच्या जातीवरून पंचायत सुरू झालीय - उद्धव ठाकरेहनुमानाची जात कोणती व धर्म कोणता या फालतू चौकशा हव्यातच कशाला? - उद्धव ठाकरे

मुंबई - सध्या देशात रामभक्त हनुमानाची जाती ठरवण्यावरुन प्रचंड चर्चा रंगली आहे. राजकीय मंडळी आपापल्या परीनं हनुमानाची जात ठरवत असल्याचे दिसत आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. ''भगवान श्रीरामा प्रति निष्ठा आणि भक्ती, त्याग आणि समर्पण हीच हनुमानाची जात. तेव्हा हनुमानाला विविध जातींची लेबले लावून उत्तर प्रदेश विधानसभेत कुणी नवे रामायण लिहीत असेल तर या नव्या रामकथेस आवर घाला. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले की, ‘भाजपचे काही लोक अतिरेकी बोलतात. त्यांच्या तोंडात बांबूच घालायला हवा.’ तीन राज्यांतील जनतेने पराभव केला हा बांबू नाही काय? तरीही हनुमानाच्या जातीच्या दाखल्यांनी सुरू झालेले नवे रामायण पुढेही असेच चालू राहील. रामायणातील इतरही सर्व पात्रांनी आपापली जातीची प्रमाणपत्रे तयार ठेवावीत!'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. 

(हनुमान मुसलमान होते, भाजपाच्या आमदाराचे वादग्रस्त विधान)

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामभक्त हनुमान दलित आणि वंचित होते, असा शोध लावला होता. "बजरंगबली असे लोकदैवत आहेत जे वनवासी, दलित आणि वंचित आहेत'', असे विधान त्यांनी केले होते. 

सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे --  अयोध्येत श्रीरामाचे मंदिर बांधायचे राहिले बाजूला, पण भारतीय जनता पक्षात रामभक्त हनुमानाच्या जातीवरून पंचायत सुरू झाली आहे. भक्ती आणि निष्ठेचा एक मार्ग हनुमानाने मानवजातीला घालून दिला. जिथे राम तिथे हनुमान हेच सत्य आहे. श्रद्धा आणि निष्ठेचे दुसरे नाव हनुमान. त्यामुळे त्याची जात कोणती व धर्म कोणता या फालतू चौकशा हव्यातच कशाला? - नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणूक प्रचारात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाबली हनुमान दलित असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर हनुमान हे आपल्याच जातीचे कसे यावर अनेकांनी दाखले दिले. - आता भाजपचे उत्तर प्रदेशातील आमदार बुक्कल नवाब यांनी महाबली हनुमानास ‘मुसलमान’ असल्याचे प्रमाणपत्र दिले व संघ परिवाराची गोची केली. आता श्रीरामाचे मंदिर उभे राहील तेव्हा महाबली हनुमानाचे काय करायचे, असा प्रश्न संघ परिवाराच्या धर्मसभेस पडला असेल. मुळात हनुमानाची जात शोधण्याचा प्रकार नालायकीच आहे. - योगी आदित्यनाथ यांनी हनुमान दलित असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचेच एक धर्मांध कार्यमंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी विधिमंडळात सांगितले, ‘छे, छे, महाबली हनुमान हे फक्त ‘जाट’ होते.’ या महाशयांनी पुढे सांगितले ते महत्त्वाचे, ‘जो दुसरों के फटे में अपना अपना पैर फंसा सकते है वह हनुमानजी हो सकते है। हनुमानजी मेरे जाती के थे।’ मंत्र्यांचे हे विधान उत्तर प्रदेश विधिमंडळाच्या ‘रेकॉर्ड’वर आहे. हा आता सरकारी दस्तऐवज झाला. हनुमानाची जातपंचायत एवढय़ावरच थांबलेली नाही. समाजवादी पार्टीचे आमदार शतरुद्र प्रकाश यांनी सांगितले, ‘हनुमान वनवासी, गिरीवासी होते.’ तिकडे बागपतच्या आमदारांनी हनुमान हे ‘आर्य’ असल्याचा शोध लावला, तर सभागृह नेते डॉ. दिनेश शर्मा यांनी तर सीतामाई म्हणजे ‘टेस्ट टय़ूब बेबी’ असल्याचा शोध लावला.- उत्तर प्रदेशात नवे रामायण लिहिले जात असून रामायणातील प्रमुख पात्रांना जातीची लेबले चिकटवली गेली आहेत. अयोध्येत रामाचे मंदिर बांधायचे आहे, पण हे लोक रामभक्ताची जात शोधत आहेत. हनुमान गढी नावाचे स्थान अयोध्येत आहे. आता हनुमान मुसलमान असल्याचे भाजपचे आमदार सांगतात. म्हणजे हनुमान गढीसुद्धा कधीकाळी मशीदच होती व आता त्या गढीबाबतही वाद निर्माण करा अशी योजना आहे काय? महाबली हनुमानाची ही एकप्रकारे टिंगलटवाळीच सुरू आहे. मात्र तरीही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे गप्पच आहेत. - हेच जर मुस्लिम किंवा ‘पुरोगामी’ मंडळींनी केले असते तर याच हिंदुत्ववाद्यांनी त्याविरुद्ध प्रचंड गदारोळ केला असता -  भगवान श्रीरामा प्रति निष्ठा आणि भक्ती, त्याग आणि समर्पण हीच हनुमानाची जात. तेव्हा हनुमानाला विविध जातींची लेबले लावून उत्तर प्रदेश विधानसभेत कुणी नवे रामायण लिहीत असेल तर या नव्या रामकथेस आवर घाला. 

टॅग्स :उद्धव ठाकरेयोगी आदित्यनाथभाजपा