मुंबई : विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी उद्धवसेनेच्या नेत्यांकडे कार्यकर्त्यांनी केल्या आहेत. त्यामुळे अशा पदाधिकाऱ्यांना पुन्हा संधी न देता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी निश्चित करण्यात येणार आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती उद्धवसेनेच्या सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईसह कोकण पट्ट्यात उद्धवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. कारण महाविकास आघाडी विरोधात काही पदाधिकाऱ्यांनी काम केले. त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मदत केली, असा आरोप करत अशा व्यक्तींना पदावरून हटविण्याची मागणी कार्यकर्त्यांनी उद्धवसेनेच्या नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे अशा पदाधिकाऱ्यांना लवकरच पदावरून दूर करण्यात येणार आहे, असे या सूत्रांनी सांगितले.
फेरबदल होणे आवश्यकपक्ष संघटनेमध्ये पदाधिकाऱ्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची आहे. कर्तृत्व, गुणवत्ता आणि काम करण्याची चिकाटी पाहून कार्यकर्त्याला पद मिळते. एखादा चांगले काम करत असेल तर त्याला शाखाप्रमुखपासून ते विभागप्रमुख अशी पदोन्नती मिळते. पक्षाची बांधणी कशी करायची याचा निर्णय पक्षनेतृत्व घेत संधी देत असते. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्ष पुढे जात असला तरी त्यामध्ये वेळोवेळी फेरबदल होणे आवश्यक आहे.आ. अनंत बाळा नर, उद्धवसेना
स्वपक्षावरच टीकाउद्धवसेनेचे नेते आ. भास्कर जाधव यांनी नुकतेच शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे. काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्याला बाजूला करण्याची हिंमत होत नाही. तो नाराज होऊ नये म्हणून दुसरे पद दिले जाते, अशी स्वपक्षावरच टीका केली होती. तसेच, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख यांचा कार्यकाळ निश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यांच्या या मागणीचा पक्ष विचार करत आहे, असे या सूत्रांनी सांगितले.