Join us

'बेरीज' चुकत असलेल्या पवारांची आम्हाला काळजी वाटते- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 09:12 IST

त्यांच्या मुलाखतीतील ‘उत्तरे’ बरोबर असली तरी त्यांच्या बेरजा-वजाबाक्यांची उजळणी पुन्हा घ्यावी लागेल.

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे अचूक राजकीय आकडेमोडीसाठी ओळखले जातात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये पवारांची बेरजा-वजाबाक्यांचीआकडेमोड चुकायला लागली आहे. त्यामुळे आम्हाला पवारांची काळजी वाटायला लागली आहे, अशी खोचक शेरेबाजी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एक मुलाखत घेतली होती. सोशल मीडिया असो किंवा इतर कोणतेही माध्यम या मुलाखतीवरून सध्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. या मुलाखतीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून भाष्य करण्यात आले आहे.गेल्या काही वर्षांमध्ये शरद पवार यांच्याकडून राजकीय भूमिका घेताना काही चुका होत असल्याचे दिसत आहे. पवारांचा यापूर्वीचा लौकिक लक्षात घेतला तर ते आधी उत्तर काढायचे आणि त्यानुसार बाकीची राजकीय बेरीज-वजाबाकीची आकडेवारी भरायचे. यामध्ये त्यांचा हातखंडा होता. मात्र, गेली काही वर्षे पवारांचे उत्तर चुकते आहे. त्यांच्या मुलाखतीतील ‘उत्तरे’ बरोबर असली तरी त्यांच्या बेरजा-वजाबाक्यांची उजळणी पुन्हा घ्यावी लागेल. ऐतिहासिक मुलाखतीने पवार इतिहासजमा तर होणार नाहीत ना? आम्हाला काळजी वाटते हो, असे या अग्रलेखात म्हटले आहे. याशिवाय, सोयीस्करपणे बदलणाऱ्या राजकीय भूमिकांवरूनही शिवसेनेने पवारांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात व देशात पवारांना मान आहे व त्यांच्या राजकीय अनुभवाविषयी आदर आहे. त्यांचे वय झाले आहे असे आम्ही सांगणार नाही, पण त्यांचा अनुभव वाढत आहे. लवकरच आमच्या मनोहर जोशींप्रमाणे त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा होईल, पण शरदचंद्र पवारांचे तेजस्वी विचार नेमके काय आहेत ते महाराष्ट्राला कधीच समजले नाहीत. २०१४ मध्ये महाराष्ट्रात भाजप सरकारला पाठिंबा देण्यासाठी ते सगळ्य़ात आधी पुढे आले व तेव्हा ‘जातीय’वादी भाजप त्यांना तेजःपुंज वाटला! आज भाजपचा पराभव हे त्यांचे ध्येय बनले आहे. या विचाराशी तरी ते ठाम राहोत, अशी खोचक टिप्पणी शिवसेनेने केली आहे. 

टॅग्स :शरद पवारउद्धव ठाकरेराज ठाकरे