Join us  

Uddhav Thackeray: खासगीकरणाची खाज वाढायला लागलीय, LIC वरुन उद्धव ठाकरेंचा खोचक टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 8:34 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एलआयसीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलं होतं

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कार्यक्रमाच्या निमित्ताने भाषण करतात. यावेळी केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपला टोमणा मारण्याची संधी ते सोडत नाहीत. त्यामुळेच, भाजपकडून टोमणे सम्राट म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात येतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही शाहू महाराजांना आदरांजली वाहताना त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला. यावेळीही त्यांनी भाजपला खोचक टोला लगावला. शाहू महाराजांनी ज्या वृत्तीविरोधात संघर्ष केले ती संपवणे गरजेचे आहे, असे विधान त्यांनी केले होते. त्यानंतर, आता खासगीकरणाच्या मुदद्यावरुन त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एलआयसीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलं होतं. भारताची सर्वात मौल्यवान संपत्ती असलेल्या एलआयसीली कवडीच्या किंमतीत का विकत आहेत, असा प्रश्न राहुल यांनी विचारला होता. सध्या एलआयसीचा आयपीओ खुला करण्यात आला असून 9 मे पर्यंत तो खरेदीसाठी खुला राहणार आहे. त्यावरुन, राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. आता, एलआयसीच्या विक्रीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारच्या काळात खासगीकरणाचा कल वाढला असून अनेक कंपन्या उद्योजकांच्या घशात घातल्या जात आहेत.   

"खासगीकरणाची खाज वाढायला लागली आहे. कुठे-कुठे खाजवणार आणि काय-काय खासगीकरण करणार हे कल्पत नाही. एलआयसीतही खासगीकरण सुरु झालं आहे. भवितव्य अंधारात जात असेल तर आपल्या संघटनेचं काम महत्त्वाचं आहे. सगळ्याचं प्रतिनिधी म्हणून काम करायला हवं. हे संपूर्ण देशात पसरलेलं आहे. देशभर आपण उभं राहू शकतो. ज्यावेळी कोणी तुमच्यावर अन्यायाचा वार करेल त्या वारचा मुकाबला करण्याची ताकद आणि हिंमत आपल्या भगव्यामध्ये आहे", असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी एलआयसीच्या सध्या विक्री होत असलेल्या केंद्राच्या धोरणावर त्यांनी निशाणा साधला. 

एलआयसी आयपीओ

भारतीय बाजारांच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ असणार एलआयसीचा आयपीओ आतापर्यंत 50 टक्क्यांपेक्षा जास्त विक्री झाला आहे. हा आयपीओ घेण्यासाठी अनेक जण इच्छूक असल्याचे दिसत आहे. 9 मे पर्यंत हा आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.  

टॅग्स :एलआयसीउद्धव ठाकरेमुंबईसरकारभाजपा