Join us

“पापी लोक शिवसेना संपवायला निघालेत, शिवसैनिक बदला घेतल्याशिवाय राहणार नाही”: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 16:03 IST

Uddhav Thackeray News: लवकरच शिर्डीला जाऊन साईबाबांचे आशीर्वाद घेणार आहे. तिथे जाहीर सभा घेणार आहे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

Uddhav Thackeray News: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अन्य पक्षांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही तयारीला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे विविध विभागांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका मातोश्रीवर घेत आहेत. यातच शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी भाजप तसेच शिंदे गटावर जोरदार टीका केली. 

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत संपूर्ण मातोश्री परिसर दणाणून सोडला. वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाची नगर जिल्ह्यातील ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. यासह नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे माजी नगरसेवक संजय छल्लारे, सुधीर वायखिडे यांनी समर्थकांसह मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला.  वाकचौरे परत शिवसेनेत आलेत. शिवसेना सोडल्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. चुकीला माफी आहे, परंतु पाप करणाऱ्यांना मात्र गाडायचे आहे. शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे, आमचे शिवसैनिक त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. 

शिवसैनिक बदला घेतल्याशिवाय राहणार नाही

शिर्डीची जागा आपलीच आहे, आपल्याला ती निवडून आणायची आहे. भाऊसाहेब यांनी शिवसेना सोडली. पण कधी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही. हे पापी, गद्दार शिवसेना संपवायला निघालेत. त्याचा शिवसैनिक बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. भाऊसाहेबांनी चूक केली होती, पण पाप केले नव्हते. भाऊसाहेब माझी माफी मागितली नाही तरी चालेल पण शिवसैनिकांची माफी मागावी. पक्ष संपवणारा विरोधक पहिल्यांदा आपण पाहत आहोत. शिवसैनिक चुकीला माफी देतो. पण पापाला माफी देत नाही, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी चांगलेच सुनावले. 

दरम्यान, शिर्डीचा खासदार आता आपलाच पाहिजे. गद्दारांची मस्ती उतरावयीची आहे. या पापी गद्दारांना गाडण्यासाठी तुम्ही तयार आहातच, असं सांगतानाच श्रद्धा आणि सबूरी गरजेची. पण यांच्याकडे ना श्रद्धा न सबूरी आहे. मी लवकरच शिर्डीला येणार आहे. साईबाबांचे आशीर्वाद घेणार आहे. शिर्डीत लवकरच जाहीर सभा घेणार आहे, अशी घोषणा करताना, दिल्लीच्या तख्तावर निर्घूण राजकारणी बसले आहेत. महाराष्ट्रातही तेच चित्र आहे. महाराष्ट्रात चमत्कार घडणार आहे. देशातच पण चमत्कार घडणार आहे, असा दावा उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. 

 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना