Join us

Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सामनाच्या संपादकपदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 14:36 IST

Uddhav Thackeray: मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर पक्षात झालेली बंडाळी मोडीत काढत पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सक्रियपणे पक्षकार्यास सुरुवात केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

मुंबई - जून महिन्यामध्ये शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर ४० हून अधिक आमदारा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर पक्षात झालेली बंडाळी मोडीत काढत पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सक्रियपणे पक्षकार्यास सुरुवात केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे दैनिक सामान हे शिवसेनेचे मुखपत्र म्हणून प्रसिद्ध आहे. शिवसेनेच्या महत्त्वाच्या भूमिका, निर्णय सामनामधून प्रसिद्ध होत असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सामनाचे संपादकपद उद्धव ठाकरे यांनी सांभाळले होते. मात्र २०१९ मध्ये राज्याच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर त्यांनी हे पद सोडले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळली होती. 

मात्र शिवसेनेत बंडाळी होऊन महाविकास आघाडी सरकार  अल्पमतात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. दरम्यान, मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून अधिक आक्रमक झाले होते. तसेच आता त्यांनी सामनाच्या संपादकपदाची धुराही आपल्या हाती घेतली आहे. आज प्रसिद्ध झालेल्या दैनिक सामनाच्या प्रेस लाईनमध्ये संपादक म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख आहे.  त्यामुळे पुढच्या काही दिवसांत सामनामधून शिवसेनेची आक्रमक भूमिका दिसण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना