मुंबई : उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता अप्रत्यक्षपणे फेटाळून लावली.
उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवाजी पार्कवर होणाऱ्या पारंपरिक दसरा मेळाव्याचे निमंत्रण देण्याचे संकेत दिले होते.
त्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. येणारा दसरा मेळावा ‘न भूतो न भविष्यती’ असेल, असेही अहिर म्हणाले.
संजय राऊतांनी काय सांगितलं?
राऊत यांनी माध्यमांना सांगितले की, उद्धव आणि राज यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे. दसरा मेळावा हा फक्त उद्धवसेनेचा असतो आणि राज ठाकरे यांचा मेळावा गुढीपाडव्याला असतो. दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत. आमची विचारसरणी एक असली तरी उद्धवसेनेच्या दसरा मेळाव्याला पक्षप्रमुख (उद्धव ठाकरे) मार्गदर्शन करतात आणि गुढीपाडव्याला राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात, असेही राऊत म्हणाले.
पण तरी प्रमुख पाहुणे म्हणून राज दसरा मेळाव्याला येऊ शकतात का? असे विचारले असता, हे मी कसे काय सांगणार? मी किंवा अन्य कोणी याविषयी मत व्यक्त करणे बरोबर नाही, ते उद्धव ठाकरे ठरवतील. आणि तसे होण्याची शक्यता या क्षणाला दिसत नाही. दोन्ही पक्ष वेगळे आहेत, असे सांगतानाच भविष्यामध्ये राजकीयदृष्ट्या एकत्र येऊन काम करण्यावरून आमच्यामध्ये सहमती झालेली आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.