आज एका कौटुंबिक कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र आलेले पाहायला मिळाले. या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोमुळे दोन्ही ठाकरे पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, आता शिंदे गटानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे गटाचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया दिली. शिरसाट म्हणाले, लग्नात भेटले तर वातावरण तापण्याची गरज नाही. राज ठाकरे यांनी अनेकदा टाळी देण्याचा प्रयत्न केला, पण उद्धव यांनी हात मागे घेतला. त्यामुळे आता एकत्र येण्याची शक्यता नाही, असंही संजय शिरसाट म्हणाले.
दरम्यान, आता भाजपाच्या नेत्यांकडूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाचे नेते मंत्री गिरीष महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. महाजन म्हणाले, राजकारणात अशा भेट होत असतात. परवा उद्धवजी देवेंद्रजी यांना भेटले होते, तेव्हाही अशी चर्चा झाली होती. अशा भेटीतून वेगळा अर्थ काढता येणार नाही, असंही महाजन म्हणाले.
पुन्हा ठाकरे बंधूंची भेट
दादरच्या राजे शिवाजी विद्यालयात आज राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचा लग्नसोहळा होता. भाच्याच्या या लग्नाला शुभेच्छा देण्यासाठी राज आणि उद्धव दोन्ही मामा एकत्र आले. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब या सोहळ्याला हजेरी लावत वधू वरांना आशीर्वाद दिले. या लग्न सोहळ्याचे काही व्हिडिओ, फोटो आता समोर आलेत. त्यात उद्धव आणि राज दोन्ही नेते बाजूला उभे राहून जोडप्यांवर अक्षता टाकत आहेत असं दिसून येते. विशेष म्हणजे नुकतेच राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थिती लावली होती.
श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक याचा विवाह सोहळा मागील रविवारी मुंबईतील ताज लँड्स या हॉटेलमध्ये झाला. पाटणकर कुटुंबीयांच्या निमंत्रणाला मान देत राज ठाकरे लग्नाला आले होते. मात्र, सोहळ्यात दोन्ही ठाकरे बंधूंची प्रत्यक्षात भेट झाली नाही. निवडणुकीत उद्धव आणि राज यांनी एकमेकांवर टीका केली होती. परंतु, मनसे आणि उद्धवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या मागणीने जोर धरला होता.