Join us  

Uddhav Thackeray: महाराष्ट्रात सध्या येणं सुरक्षित नाही, दिपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 5:02 PM

शिंदे गटाचे प्रमुख शिलेदार दिपक केसरकर यांना महाराष्ट्रात कधी येणार, महाराष्ट्रात का येत नाहीत, असा प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टच भूमिका मांडली

मुंबई - राज्यात शिवसेना आमदारांचा एक मोठा गट फुटून वेगळा झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून मोठा सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४२ आमदारांनी बंड पुकारलं आहे. आता, हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. त्यातच, आज शिंदेगटाने 'शिवसेना बाळासाहेब' असं नाव आपल्या गटाला दिल्याने वाद अधिकच तीव्र झाला आहे. तर, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. त्यानंतर, शिंदे गटाच्यावतीने मंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. 

शिंदे गटाचे प्रमुख शिलेदार दिपक केसरकर यांना महाराष्ट्रात कधी येणार, महाराष्ट्रात का येत नाहीत, असा प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टच भूमिका मांडली. सध्याचं वातावरण पाहता आत्ता महाराष्ट्रात येणं सुरक्षित वाटत नाही. आमच्याकडे बहुमताचा 2/3 चा आकडा आहे. दबावाखाली जे निर्णय होतात, ते बघता सेफ वाटत नाही. एकीकडे आम्हाला मुंबईत यायला सांगतात आणि दुसरीकडे संजय राऊत हेच लोकांना रस्त्यावर उतरायला सांगतात. त्यावर, महाराष्ट्र सरकारने कुठलिही कारवाई केलेली नाही. अन्य व्यक्तीने असं सांगितलं असतं तर कारवाई केली असती की नाही, असा प्रतिसवाल केसरकर यांनी केला. तसेच, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे नॉर्म पाळायला हवेत. आमच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची, कुठलंही वातावरण न चिघळू देण्याची ही मुख्यमंत्र्यांची घटनात्मक जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

मातोश्रीहूनच इकडे आलोय

मी इकडे येण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटलो. मी आमची बाजू त्यांच्याजवळ मांडली. माझ्यासह पक्षातील वरिष्ठ मंत्र्यांनीही त्यांना येथील आमदारांचे म्हणणे सांगितले होते. आम्ही तिथूनच इकडे आलो आहोत. मग, आता तिकडे जाऊन वेगळं काय सांगणार, असेही केसरकर यांनी म्हटले.  

संजय राऊतांना दिलं उत्तर

आम्हाला उद्या जाऊन मतं मागायची नाहीत 2.5 वर्षानंतर मतं मागायची आहेत, आत्ताच मत मागायची नाहीत. मी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलो आहे. त्यामुळे, मी अगोदर दुसऱ्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आलो होतो. म्हणजे, केवळ पक्षाच्या तिकीटावरच नाही, तर स्वत:च्या कामावर, स्वत:च्या लोकप्रियतेवरही, स्वताच्य जनसंपर्कावर आमदार निवडून येत असतात. संजय राऊत यांना असं बोलायची सवय आहे, ते विधिमंडळाचे सदस्य नाहीत. त्यामुळे, त्यांना आम्ही गंभीर घेत नाही, असे केसरकर यांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाले होते संजय राऊत

शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या 6 नंबरच्या ठरावात शिंदे गटाच्या शिवसेना बाळासाहेब या नावाला आक्षेप घेण्यात आला आहे. कार्यकारिणीच्या ठराव क्रमांक 6 मध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे की, इतर कोणत्याही संघटनेला शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. कोणताही बेईमान, कोणताही गद्दार हे नाव वापरुन आपलं राजकारण, आपला स्वार्थ साधू शकत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वात महत्त्वाचा मुद्दा मांडला की, जर तुम्हाला मतं मांडायची आहेत, तर तुमच्या बापाच्या नावाने मांडा, शिवसेनेच्या बापाच्या नावाने नको, असेही राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  

टॅग्स :दीपक केसरकर उद्धव ठाकरेशिवसेनासंजय राऊत