Tejasvi Ghosalkar: राज्यात काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेचीही निवडणूक होणार असून या निवडणुकांची तयारी सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे मुंबईत ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकर या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्या पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता घोसाळकर यांना मुंबई बँकेचे संचालक पद दिले आहे. सध्या मुंबई बँकेवरभाजपाच्या प्रवीण दरेकर यांची सत्ता आहे, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांवर आता तेजस्वी घोसाळकर यांनी प्रतिक्रिया दिली.
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
"मी पक्षात नाराज होते. पण उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर त्यांनी माझी नाराजी दूर केली. त्यामुळे मी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. ते माझे कुटुंबप्रमुख आहेत. मी दुसऱ्या कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचार केलेले नाही. असं काहीही झालेलं नाही. या सगळ्याला वेगळे वळण दिले जात आहे, असंही तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या.
तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, 'माझ्या पुढच्या वाटचालीबाबत बोलायचे झाले तर मी पहिल्यांदाच सहकार क्षेत्रात काम करत आहे. अभिषेक दोन टर्म इकडे संचालक होते. त्यांचा सहकार क्षेत्राचा अभ्यास खूप जास्त होता. मीदेखील चांगले काम करण्याचा प्रयत्न करेन. आता सहकार आणि राजकारण हे दोन्ही वेगवेगळे ठेवून समाजकारण करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
मी उद्धव ठाकरे यांची भेट घेईन
"मी योग्यवेळी भूमिका मांडेन, असे म्हटले होते. पण सध्या माझी कोणतीही भूमिका नाही. तुम्ही या सगळ्याला वेगळे वळण लावत आहात. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, अजूनही त्यांच्यासाठीच काम करत आहे. आता संचालक पद मिळाल्यानंतर मी उद्धव ठाकरे यांची भेट घेईन. मला त्यांचे आशीर्वाद मला पाहिजे आहेत. ते माझे कुटुंबप्रमुख", असं स्पष्टीकरण तेजस्वी घोसाळकर यांनी दिले.