Join us

CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 19:23 IST

उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Uddhav Thackeray Meet CM Devendra Fadnavis: राज्यात गेल्या काही दिवसांपासून त्रिभाषा सूत्र आणि पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णयाविरोधात मराठी भाषिक प्रेमींनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला होता. मनसे आणि ठाकरे गटाने रस्त्यावर उतरून याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा संदर्भातील शासन निर्णय रद्द केल्याच जाहीर केलं. मात्र त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करणार असल्याचे म्हटलं आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाने मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन पुन्हा एकदा हिंदी सक्तीला विरोध दर्शवला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच असं म्हटलं. त्यानंतर आज  उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील विविध संपादकांनी हिंदीसक्तीविरोधात लिहिलेल्या लेखांचे ‘हिंदीची सक्ती हवीच कशाला?’ हे पुस्तक  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सभापती राम शिंदे यांना भेट दिले.

पहिलीपासून हिंदी सक्ती का करताय? - आदित्य ठाकरे

"पाचवीपासून हिंदी आहेच. पण पहिलीपासून का सक्ती करताय? पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याचा कोणता कायदा काढला आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही एक पुस्तक दिलं आहे. त्यामध्ये अनेक पत्रकार, संपादक, अराजकीय व्यक्तींनी पहिलीपासून त्रिभाषिक धोरण का असू नये यावर लेख लिहीले आहेत," असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

काल ऑफर, आज अर्धातास चर्चा

बुधवारी अंबादास दानवे यांच्या निरोपसमारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ऑफर दिली होती. "उद्धवजी आता २०२९ पर्यंत काही करायचं नाही. आम्हाला तिकडे यायचा स्कोप उरला नाही. मात्र तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे. त्यावर वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आज विधिमंडळातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री फडणवीस आणि  उद्धव ठाकरें यांच्यात  अर्धा तास चर्चा झाली. 

टॅग्स :विधानसभाउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसहिंदी