Join us  

नाराज अब्दुल सत्तारांच्या पारड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टाकली महत्त्वाची खाती 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 10:48 AM

केवळ राज्यमंत्रिपदावर बोळवण झाल्याने शिवसेनेचे सिल्लोडमधील आमदार अब्दुल सत्तार यांनी नाराज होऊन राजीनामा दिल्याच्या वृत्ताने शनिवारी राज्यातील राजकारणात खळबळ उडवून दिली होती.

मुंबई - गेल्या आठवडाभरापासून नवनियुक्त मंत्र्यांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर आज सकाळी जाहीर झाले आहे. दरम्यान,खातेवाटपामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराज आमदार अब्दुल सत्तार यांच्या पारड्यात महत्त्वाची खाती टाकली आहे. राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झालेल्या सत्तार यांच्याकडे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य या खात्यांची जबाबदारी असणार आहे. 

 केवळ राज्यमंत्रिपदावर बोळवण झाल्याने शिवसेनेचे सिल्लोडमधील आमदार अब्दुल सत्तार यांनी नाराज होऊन राजीनामा दिल्याच्या वृत्ताने शनिवारी राज्यातील राजकारणात खळबळ उडवून दिली होती. नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपास विलंब होत असतानाचा अब्दुल सत्तार यांच्या नाराजीने शनिवारी शिवसेनेची चिंता वाढवली होती. राज्यमंत्रिपदावरच बोळवण झाल्याने सत्तार यांनी खातेवाटप होण्यापूर्वीच राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचेही वृत्त धडकले होते. मात्र माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी यशस्वी शिष्टाई करत सत्तार यांच्या नाराजीवर पांघरूण घातले होते. दरम्यान, आज अब्दुल सत्तार हे आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेण्याची शक्यता आहे. 

आज जाहीर झालेल्या खातेवाटपामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत:कडे सामान्य प्रशासन तसेच विधी व न्याय ही खाती ठेवली आहेत. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख गृहमंत्री, शिवसेनेचे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात महसूल, तर अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील. सामाजिकदृष्ट्या दोन महत्त्वाच्या खात्यांपैकी आदिवासी विकास खाते काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य के. सी. पाडवी यांच्याकडे, तर सामाजिक न्याय खाते राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्याकडे सोपविले आहे.  

टॅग्स :अब्दुल सत्तारउद्धव ठाकरेशिवसेनामहाराष्ट्र सरकार