Join us

एक तर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन! उद्धव ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 06:12 IST

हे आपल्यासाठी शेवटचे आव्हान आहे. त्यानंतर आव्हान देणारे कोणी राहणार नाही. शिवसेना ही गंजलेली तलवार नाही, तर तळपती तलवार आहे. मुंबई टिकवण्यासाठी लढा द्यायचा आहे, असे ठाकरे म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक माझ्या घरावर चालून येत आहेत. अनिल देशमुख यांनी सांगितले की मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे डाव होते. पण हे सगळे सहन करून मी हिमतीने उभा राहिलेलो आहे. मी तडफेने उतरलोय, तेव्हा एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन,’ असे आव्हान उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले.

शाखाप्रमुखांचा मेळावा रंगशारदा सभागृहात झाला. यावेळी ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले,  गीतेमध्ये हेच सांगितले आहे की, ज्यावेळी अर्जुनाने पाहिले की, सगळे नातेवाईक त्याच्या विरोधात युद्धभूमीवर उभे ठाकले आहेत. यातना होणे स्वाभाविक आहे, मलाही होत नसतील का? भाजप म्हणजे चोर कंपनी आहे, ही राजकारणातील षंढ माणसे आहेत.

हे शेवटचे आव्हान

हे आपल्यासाठी शेवटचे आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणारे कोणी राहणार नाही. शिवसेना ही गंजलेली तलवार नाही, तर तळपती तलवार आहे. मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे, असेही ठाकरे म्हणाले.

...ही तर मानसिक दिवाळखोरी

उद्धव ठाकरे यांनी ज्या भाषेचा वापर केला आहे, त्यातून त्यांनी मानसिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे. उद्धव ठाकरेंना चिथावणी देणारी भाषा शोभत नाही. अशा भाषेचा वापर हिंदुत्व सोडून ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांच्या भरवशावर ते करीत आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याला विकासाकडे नेणारे आणि नवे व्हिजन देणारे नेतृत्व आहे. भाजप त्यांच्या ‘अरे’च्या भाषेला ‘कारे’ने उत्तर देईल. - चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष

 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनादेवेंद्र फडणवीस