Uddhav Thackeray on Ashok Kharat स्वतःला कॉस्मॉलॉजी एक्सपर्ट आणि मर्चंट नेव्हीचा कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या तथाकथित ज्योतिष अशोक कुमार खरात याला नाशिक पोलिसांनी एका महिला अनुयायावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली. या अटकेनंतर केवळ खरातचेच चेहरे समोर आले नाहीत, तर राज्याच्या राजकारणातही मोठा भूकंप झाला आहे. खरातचे सत्ताधारी नेत्यांशी असलेले संबंध समोर आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत भोंदू बाबासह त्याच्या राजकीय भक्तांवरही कारवाई करा, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. "आणखी किती खालच्या पातळीवर महाराष्ट्राला नेणार आहोत. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा आहे. पण त्या कायद्याचे पालन करणारेच अशा भोंदू बाबाच्या नादी लागणार असतील त्याच्या बरोबर भोंदू भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे. राजकारणात जे भक्त दिसत आहेत त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. कर्तृत्व शून्य असे नेते किंवा जे पुढारी आहे त्यांना असे मार्ग अबलंबवावे लागतात. ते स्वतः भाकड आणि भोंदू असल्याने त्यांना अशा भोंदूगिरीचा आसरा घ्यावा लागतो," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पाणी कुठपर्यंत मुरलं आहे ते कळू द्या
अशोक खरातच्या मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानसाठी दारणा धरणातून पाणी देण्याचा निर्णय ठाकरे सरकारच्या काळात झाला. अशोक खरातच्या शिवनिका संस्थानसाठी दारणा धरणातून ३९ लाख लिटर पाणी देण्याच्या मंजुरीचा निर्णय ठाकरे सरकारच्या काळात झाला. यावरही उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. "तुम्ही सर्वांची चौकशी करा, पाणी कुठपर्यंत मुरलं आहे ते कळू द्या. जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा करा आणि जर पाणी वळवलं असेल तर ते पाणी कुठपर्यंत मुरलं आहे ते कळू द्या. फक्त ते कळल्यावर त्याच्यावर काही कारवाई झाली पाहिजे," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
पीडित महिलेने लावलेल्या आरोपानुसार, खरातने २०२२ पासून २०२५ या तीन वर्षांच्या काळात तिला आपल्या जाळ्यात ओढले. आपल्याकडे दिव्य शक्ती असल्याचा दावा करून आणि आध्यात्मिक भीती दाखवून खरातने पीडितेवर वारंवार अत्याचार केले. खरात हा स्वतःला १२ भाषा जाणणारा, निसर्ग, प्राणी आणि सजीव-निर्जीव वस्तूंचे भविष्य ओळखणारा तज्ज्ञ मानत असे. याच भोंदूपणाचा वापर करून त्याने अनेक महिलांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
राजकीय कनेक्शन आणि फोटोंमुळे खळबळ
खरातला बेड्या पडताच सोशल मीडियावर त्याचे हाय-प्रोफाईल फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचे खरातचे फोटो समोर आल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. यानंतर रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.