मुंबई : देशाला कणखर पंतप्रधान मिळेल या आशेने आम्ही भाजपाला पाठिंबा दिला होता. मात्र त्यांची परराष्ट्र नीती पाहता हे सरकार न्याय देईल, असे वाटत नाही. दहशतवादी हल्ले थांबेपर्यंत पाकिस्तानशी सर्व संबंध तोडले पाहिजेत. अंगात सिंदूर नव्हे, तर राष्ट्रगीत ऐकू आल्यानंतर जसे आपण उभे राहतो, तशी खरी
देशभक्ती भिनली पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली.
१४ सप्टेंबरला अबुधाबीत भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे. क्रिकेटमध्ये खेळाडू बाद झाला तर पुढच्या सामन्यात पुन्हा खेळू शकतो, पण शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त होतो.
त्यामुळे क्रिकेटचे युद्ध हा केवळ भंपकपणा आहे. भाजपने देशभक्तीचाही व्यापार सुरू केला आहे. हिंदुत्व आणि देशापेक्षा व्यापार मोठा आहे का, हे मोदींनी स्पष्ट करावे. हा सामना होणार नाही, असे त्यांनी घोषित केले पाहिजे, असे ते म्हणाले.
सिंदूर दांडिया आयोजित करणे लाजिरवाणे
भाजपने घर घर सिंदूर मोहीम निषेधानंतर मागे घेतली. पण, आता विक्रोळीत मराठी दांडियाची थीम ऑपरेशन सिंदूरवर ठेवली आहे. पहलगाममध्ये सौभाग्य हिरावलेल्या माता-भगिनींचा आक्रोश ताजा असताना देशभक्तीच्या नावाखाली सिंदूर दांडिया आयोजित करणे ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे उद्धवसेना राज्यभरातील महिला कार्यकर्त्यांना मोठ्या चौकात जमवून कुंकवाचे डबे भरून ते पंतप्रधान कार्यालयाला पाठवणार आहे, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
बाळासाहेबांवरील आरोप सहन करणार नाही
भाजपने बाळासाहेब ठाकरे यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दलही उद्धव ठाकरे आक्रमक झाले. नवाझ शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदी पाकिस्तानला गेले होते. पण, बाळासाहेब कधीही जावेद मियाँदादच्या घरी गेले नाहीत. त्यांनी नेहमीच भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध केला होता. त्यामुळे बाळासाहेबांवरील आरोप आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.