Join us

“तुमच्या मागण्या ऐकून मला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटते”: उद्धव ठाकरे; RSS-BJPवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 18:32 IST

Uddhav Thackeray News: मी घरी बसून निदान काहीतरी काम केले. यांनी घरोघरी जाऊन काय दिवे लावले माहिती नाही, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

Uddhav Thackeray News: कुंभमेळ्यात अनेक जण डुबकी मारायला जात आहेत. प्रत्येकाची श्रद्धा आहे यावर बोलत नाही. पंतप्रधानांनी कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारली, पण पीओपी मूर्तींना विसर्जन करु देत नाहीत. अरे तिकडे पंतप्रधान डुबकी मारतात. पीओपी मुर्तीमुळे प्रदूषण होते ठीक आहे. पण तुम्ही आदल्या दिवशी सांगतात की, विसर्जन होऊ शकत नाही. माघी गणेशोत्सवातील अनेक मूर्ती विसर्जनाच्या राहिल्या आहेत. तुम्ही ऐनवेळी नियम लावतात आणि पीओपी मूर्तींचे विसर्जन करू देत नाही हे तुमचे कसले हिंदूत्व? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. 

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अधिवेशनात उद्धव ठाकरे बोलत होते. सातवीत बाळासाहेब आणि माझ्या आजोबाना पैसे नव्हते म्हणून शाळा सोडावी लागली होती, अशी आठवण सांगताना, शिक्षकांसोबतची वागणूक बदलायाला हवी. शिक्षक भरती सुद्धा कंत्राटदाराद्वारे होत आहे. कोण हा कंत्राटदार, शिक्षकांची कंत्राट भरती कशी करणार? पु. ल. देशपांडे म्हणत असत की, धरावे त्याचे पाय आणि हार घालावे तसे गळे दिसत नाहीत. धरावे असे गळे खूप दिसतात, पण ते धरता येत नाहीत हीच पंचाईत आहे, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

तुमच्या मागण्या ऐकून मला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटते

गुरुजनांना मी काय मार्गदर्शन करणार? मला खात्री नव्हती शिक्षक मतदारसंघ आपण जिंकू त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभार. आपण हा मतदारसंघ लढलो नव्हतो. शिक्षक आणि शिवसेना नाते कधी जुळेल असा वाटत नव्हते, पण ते जुळले. एक गाणे आहे ना आमदार झाल्यासारखे वाटते, तसे तुमच्या मागण्या ऐकून मला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटते, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर टीका

जिथे जिथे जातो तिथे म्हणतात उद्धवजी असे होऊ शकत नाही, तुमचा पराभव होऊ शकत नाही. आता लाडकी बहीण योजनेमध्ये ५ लाख बहीण अपात्र करत आहात. लाडका भाऊ दूरच आणि हे दुष्ट शिवभोजन थाळी जी आपण सुरू केली, ती बंद करायला चालले आहेत. ते तिकडे चालले डुबकी मारायला, डुबकी मारणे हे आमचे हिंदूत्व नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, व्हर्च्युअल शिक्षण महापालिकेच्या शाळेत आपण सगळ्यात आधी सुरू केले. मी घरी बसून निदान काहीतरी काम केले. यांनी घरोघरी जाऊन काय दिवे लावले माहिती नाही, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तसेच शिक्षक निवडणूक यंत्रणेचे काम करू शकतात. पण, निवडणूक प्रचाराचा काम करू शकत नाही. शिक्षक आपल्या पक्षाचा प्रचार का करू शकत नाही? शिक्षकांना प्रचारासाठी अडवणारे तुम्ही कोण? आरएसएस जिथे जातात तिथे पोखरायला लागतात, अशी टीका ठाकरेंनी केली. गाववाड्या वस्तीत जा, लोकांना दिशा दाखवा, तुम्ही शिवसेनेचे सदस्य व्हा, आता फावला वेळ आहे त्याच्यात प्रचार करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना