Join us  

अमित शहांना पर्रीकरांच्या प्रकृतीपेक्षा राज्य गमावण्याची भीती - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 7:48 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. गोव्यातील राजकीय घडामोडींवरुन त्यांनी अमित शहा आणि भाजपावर निशाणा साधला आहे.  ''गोव्यात आज राजकीय नेतृत्व कोणत्याही पक्षात उरले नसून फक्त बाजारबुणगे राहिले आहेत. गोव्यात सगळेच बिघडले आहे. पर्रीकर ठणठणीत होते तेव्हा आकाशातून चांदण्यांची बरसात होत होती व सर्वकाही आलबेल होते अशातला भाग नव्हता, पण सत्ता व धाकदपटशाच्या बळावर ते रेटून नेत होते.  गोव्यात मुख्यमंत्री बदलावा अशी स्थिती आहे, पण भाजपला पर्रीकरांच्या नावाने वेळ काढून लोकसभा निवडणुकीपर्यंत ‘रेटारेटी’ करायची आहे. ‘मढ्यावरचे लोणी खाणे’ म्हणजे काय हे गोव्यातील आजचे राजकारण पाहता समजून येईल. पर्रीकरांनी खडखडीत बरे होऊन गोव्यात परतावे हाच त्यावरचा उपाय. तसे झाले तर आनंदच आहे''',  

सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे - - गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहतील, नेतृत्वबदल होणार नाही असे आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. पर्रीकर हे गोव्यात नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत गोव्याचे प्रशासन हे ढेपाळले आहे. 

- मुख्यमंत्री व त्यांचे कॅबिनेट पक्षाची सोय म्हणून काम करीत नसते, तर राज्याचे गाडे पुढे नेण्यासाठी काम करीत असते. पर्रीकर यांना बदलायचे तर मग त्यांच्या जागी बसवायचे कुणाला? कारण मुख्यमंत्रीपदी बसवता येईल असा एकही लायकीचा माणूस गोव्याच्या भाजपात नाही. 

- आजारी व थकलेल्या पर्रीकरांच्याच पादुका मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर ठेवून सरकार चालवा असा संदेश अमित शहा यांनी दिला आहे. हा निर्णय म्हणजे गोव्याच्या जनतेवर आणि खुद्द पर्रीकर यांच्यावर अन्याय आहे. 

-  पर्रीकरांच्या प्रकृतीपेक्षा राज्य गमावण्याची भीती आहे. भाजपच्या विजयी नकाशावरील गोवा टिकला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे. 

- मगो पक्षाचे नेते आणि पर्रीकर मंत्रिमंडळातील सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते आणि मंत्री विजय सरदेसाई यांनी ‘बेडूकउडी’ मारल्याशिवाय काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, पण सरदेसाई व ढवळीकर या दोघांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. 

- गोव्यात आणखी किती काळ ‘आजारी मुख्यमंत्री’ ठेवायचा याचाही निर्णय भाजप श्रेष्ठींना घ्यावाच लागणार आहे. 

- गोव्यात सगळेच बिघडले आहे. पाऊसपाण्यापासून उद्योग-व्यवसाय, विकास अशा सर्वच मुद्यांवर संकटे घोंगावत आहेत. 

टॅग्स :गोवाउद्धव ठाकरेमनोहर पर्रीकरअमित शाह