Join us  

घात, विश्वासघात, खंजीर खुपसणे वगैरे शब्द योगी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी शोभत नाहीत-उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 7:46 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. 

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. शिवसेना नाव जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे घेत असली तरी तिची करणी मात्र अफजलखानाची आहे, अशी घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर सभेत केली होती. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून योगी आदित्यनाथांवर बोचरी टीका केली आहे.

''ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत त्यांच्या हयातीत खंजीर खुपसले त्याच हातांना तुम्ही ‘मेहंदी’ लावून नवरदेव बनवलेत ना? त्यामुळे घात, विश्वासघात, खंजीर खुपसणे वगैरे शब्द योगी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी शोभत नाहीत. खंजीर उलटू शकतो हे ध्यानात ठेवा. अफझलखानाचा कोथळा असाच निघाला होता. अफझलखानाने शिवरायांच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवरायांनी सरळ समोरून खानाचा कोथळाच काढला. ज्यांना शिवरायांना हार घालण्याआधी पायातल्या चपला काढता येत नाहीत त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची'', अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले आहे.

- काय आहे आजचे सामना संपादकीय?महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल लागले आहेत. शिवसेनेचा पराभव व्हावा यासाठी ‘बेइमान’ युत्या आणि आघाडय़ा झाल्या. पालघरात शिवसेना स्वतंत्रपणे लढत आहे. याचा बदला म्हणून नाशकात ‘भाजप’वाले राष्ट्रवादीच्या शेजेवर चढले. कोकण मतदारसंघात ते वेगळाच दशावतार करू लागले. परभणी, हिंगोलीतली पावलेही तशी वाकडीच पडत होती. हे सर्व हलाहल पचवून शिवसेनेने नाशिक ठासून जिंकले व परभणी-हिंगोली खेचून जिंकले. बेइमानी राजकारण स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या मतदारांनी साफ उपडे केले. परभणीत शिवसेनेचे विप्लव बाजोरिया जिंकले. त्यांनी ऐनवेळेस निवडणुकीत उडी घेतली व विजय मिळविला. शिवसेनेच्या मतदारांची संख्या कमी असतानाही हा विजय मिळवून अनेक राजकीय चाणक्यांना मात दिली. नाशकात शिवसेनेची २०७ मते असताना शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांना ३९९ मते पडावीत हा चमत्कार म्हणायला हवा. येथे भारतीय जनता पक्षाने ऐन वक्तास राष्ट्रवादीचा मुका घेतला, पण मुका नीट घेता आला नाही व उमेदवाराच्या ओठाचा लचका पडला. शिवसेनेच्या विरोधात जितके ‘डाव’ टाकाल तितकी शिवसेना जेरात पुढे जाईल. एका मजबुतीने आगीच्या लोळातून तावूनसुलाखून बाहेर पडेल. उत्तर प्रदेशचे ढोंगी मुख्यमंत्री पालघरात प्रचारास आले व तोफांतून पिचकाऱ्या मारून गेले. 

काय, तर म्हणे शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेब असते तर असे घडले नसते, अशा पिचकाऱ्या सोडणाऱ्यांना इतिहास किंवा छत्रपती समजलेच नाहीत. एखाद्या बेफाम माथेफिरू खुन्याप्रमाणे भाजप सध्या दिसेल त्याच्या पाठीत खंजीर खुपसत आहे व त्याबाबतची वृत्ते रोजच प्रसिद्ध होत आहेत. पालघरात शंभर नंबरी काँगेसवाल्या राजेंद्र गावितांना उमेदवारी देणे व त्यांच्या प्रचारासाठी येऊन शिवसेनेवर आग्यावेताळाप्रमाणे बोलणे यास पाठीत खंजीर खुपसणे नाही म्हणावे तर काय म्हणावे? अगदी कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची जागा स्वतः भाजपने एकवेळ लढवली असती तरी आम्ही समजू शकलो असतो, पण शिवसेनेच्या विरोधात या जागेचा अफझलखानी नजराणा ज्यांना बहाल केला तो काय म्हणून घ्यायचा? ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत त्यांच्या हयातीत खंजीर खुपसले त्याच हातांना तुम्ही ‘मेहंदी’ लावून नवरदेव बनवलेत ना? त्यामुळे घात, विश्वासघात, खंजीर खुपसणे वगैरे शब्द योगी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी शोभत नाहीत. आम्ही निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. मग पालघरची लोकसभा पोटनिवडणूक असो की कालची विधान परिषदेची निवडणूक. ही उद्याच्या लढाईची सुरुवात आहे. 

परभणी व नाशिकच्या जागा शिवसेनेकडे नव्हत्या हे लक्षात घेतले व तेथील विजयाचा आकडा पाहिला तर सत्तेचा दाबेली प्रयोग चालला नाही व राजकारणात ‘नजरबंदी’ किंवा जादूचे प्रयोग आम्हालाही करता येतात हेच सिद्ध झाले आहे. आम्हास पाण्यात पाहणाऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. नाशिक, परभणी शिवसेनेने जिंकले ही सुरुवात आहे. पालघरचा विजय हा ट्रेलर असेल. त्यानंतरची घोडदौड महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल. इतर पक्षांतील माणसे भाडय़ाने घेता येतात. राजकारणात सर्वत्र स्वार्थाचा मायाबाजार भरला आहे. शिवसेनेचा भगवा झेंडा सगळ्यांहून वेगळा आहे. योगी आदित्यनाथांसारखे लोक महाराष्ट्रात येऊन प्रवचने झोडतात. मरगट्टय़ांना ‘छत्रपती’ काय ते शिकवतात व पायात खडावारूपी चपला घालून शिवरायांना पुष्पमाला चढवतात. यावर भाजपचे काय म्हणणे आहे? शिवरायांचा हा अपमान पाहून थडग्यातला अफझलखानही आनंदाने नाचत असेल. भाजप महाराष्ट्रात धोतऱ्याच्या बिया पेरत आहे. राज्य अशाने विनाशाकडे जाईल. महाराष्ट्र सचोटी व प्रामाणिकपणासाठी ओळखला जातो. भाजप त्यास सुरुंग लावत आहे. कोकण-नाशकात राष्ट्रवादीस त्या पक्षाने खुला पाठिंबा दिला. हा कुणाच्या पाठीत खंजीर होता? खंजीर उलटू शकतो हे ध्यानात ठेवा. अफझलखानाचा कोथळा असाच निघाला होता. अफझलखानाने शिवरायांच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवरायांनी सरळ समोरून खानाचा कोथळाच काढला. ज्यांना शिवरायांना हार घालण्याआधी पायातल्या चपला काढता येत नाहीत त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची!

टॅग्स :उद्धव ठाकरेनरेंद्र मोदीयोगी आदित्यनाथ