Join us  

शिवसेनेवर दुगाण्या झाडणारे भाजपाचे नेतेच आज प्रणवबाबूंची आरती ओवाळताहेत - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 9:12 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 7 जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी व सरसंघचालक मोहन भागवत हे एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहे. 

''राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिला म्हणून शिवसेनेवर दुगाण्या झाडणारे भाजपचे नेतेच आज प्रणवबाबूंची आरती ओवाळत आहेत, त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळत आहेत. २०१२ साली योग्यता असूनही ज्यांनी प्रणव मुखर्जी यांना राजकीयदृष्ट्या अस्पृश्य ठरवले तेच आज प्रणवबाबूंचे गुणगाण गात आहेत. राजकीय स्पृश्य-अस्पृश्यतेची व्याख्या नव्याने सांगितली जात आहे. राजकारणाच्या पलीकडचा विचार असा असतो तर'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. 

- काय आहे आजचे सामना संपादकीय?माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाणार म्हणून सध्या देशभर गहजब सुरू आहे. मुखर्जी नागपूरला जाणार म्हणजे काहीतरी भयंकर पाप करणार आणि सरसंघचालक मोहन भागवतांच्या शेजारी बसून संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार म्हणजे देशावर जणू आभाळच कोसळणार असे चित्र उभे केले जात आहे. ज्या कार्यक्रमासाठी प्रणवदा रेशीमबाग या नागपुरातील संघाच्या स्मृतीमंदिरात जाणार आहेत तो कार्यक्रम ७ जूनला होणार आहे. तथापि, आठवडाभर आधीच यावरून जो धुरळा उडवला जात आहे त्यामुळे देशातील जनतेची मात्र करमणूक होत आहे. वृत्तवाहिन्यांवर तर या मुद्दयावरुन चर्चेचे गुऱ्हाळच सुरू आहे. काँग्रेस, भाजप, डावे यांचे प्रतिनिधी आणि एखादा विश्लेषक सोबतीला घेऊन तावातावाने भांडण लावण्याचे उद्योग सुरू आहेत. संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणे ही किती भयंकर गोष्ट आहे आणि प्रणवदांनी ही चूक कदापि करता कामा नये, असा गळा काँग्रेजी व तथाकथित  ‘सेक्युलर’ नेते काढत असतानाच आमच्या मित्रपक्षानेही प्रणव मुखर्जी यांच्यासाठी जोरदार वकिली सुरू केली आहे. प्रणव मुखर्जी हे कसे महान व्यक्तिमत्त्व आहे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही गोष्टींचा विचार कसा करायला पाहिजे, राजकीय अस्पृश्यता बाळगणे कसे चुकीचे आहे वगैरे वगैरे ‘बोधामृत’ भाजपच्या वतीने आता पाजले जात आहे. म्हणजे ज्या पक्षाने प्रणव मुखर्जींना राष्ट्रपती केले ते काँग्रेसवाले आज प्रणवबाबूंना शिव्याशाप देत आहेत आणि ज्या भाजपने २०१२ साली राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी यांना पराभूत करण्यासाठी जंगजंग पछाडले ते आमचे मित्रवर्य आज प्रणवबाबूंची आरती ओवाळत आहेत. राजकारणाचा महिमा हा असा अगाध आहे. राजकारण गेले चुलीत, पण प्रणव मुखर्जी हे या देशाचे माजी राष्ट्रपती आहेत. 

त्यांनी कुठल्या कार्यक्रमाला जावे आणि कुठल्या नाही हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार त्यांचाच आहे. रा. स्व. संघाच्या कार्यक्रमाला मुखर्जींनी जावे यात पोटशूळ उठण्याचे कारणच काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काही लश्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन, जैश-ए-मोहंमद किंवा अल कायदासारखी अतिरेकी संघटना नव्हे. हिंदुत्ववादी देशभक्तांची ती एक राष्ट्रीय संघटना आहे. मुळात कोणी कोणाच्या व्यासपीठावर गेल्याने भ्रष्ट होत नाही हा साधा विचार आहे. शिवसेनेनेही बनातवालासारख्या नेत्याला आपल्या व्यासपीठावर बोलावले होते. भिन्न विचारसरणीचा नेता शिवसेनेच्या व्यासपीठावर आला आणि त्यातून मुख्य प्रवाहात आणण्याचा काही प्रयत्न झाला तर त्यात गैर ते काय? भिन्न विचारसरणीच्या व्यासपीठावर जाणे म्हणजे विटाळ हा विचार फक्त राजकारण्यांच्या सडक्या मेंदूतूनच निघू शकतो.  शिवसेनाप्रमुख राजकारणाला गजकर्ण का म्हणायचे ते अशावेळी पटते. प्रणवबाबू संघाच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून गेले म्हणजे ते स्वयंसेवक झाले असेही समजण्याचे कारण नाही. सरसंघचालक मोहन भागवतांच्या भाषणानंतर प्रणव मुखर्जी जो काय विचार मांडायचा आहे तो आपल्या भाषणात मांडतीलच. समोर बसलेल्या स्वयंसेवकांनीही तो विचार ऐकून घ्यायला हवा, मात्र त्याआधीच बोंबाबोंब कशासाठी? बरं, प्रणव मुखर्जी यांना फुकटचे सल्ले देणाऱ्यांची पात्रता काय? प्रणवबाबू हे देशातील एक ज्येष्ठ आणि जुनेजाणते नेते आहेत. राजकारणातील अनेक महत्त्वाची पदे भूषवत ते राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचले. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी जरूर राजकारण केले, मात्र त्यांनी काँग्रेस पक्षासोबतच देशाचीही सेवा केली. खरेतर काँग्रेसने पंतप्रधानपद नाकारून प्रणवबाबूंवर घोर अन्यायच केला होता. आज तीच काँग्रेस उपकारकर्त्याच्या भावनेतून प्रणवदांना संघाच्या कार्यक्रमाला जाऊ नये यासाठी अकांडतांडव करत आहे. 

प्रणव मुखर्जी हे देशाचे माजी राष्ट्रपती आहेत. ज्या दिवशी त्यांनी देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली त्याच दिवशी त्यांचे पक्षीय राजकारण संपले. मग त्यांना आता काँग्रेसची वस्त्र्ाs पांघरून संघापासून दूर राहण्याचे सल्ले देण्याची उठाठेव हवीच कशाला? खरेतर प्रणव मुखर्जी यांच्यासारख्या स्वयंभू आणि  जाणकार व्यक्तीला सल्ले देणे हाच मुळी पोरकट आणि हास्यास्पद प्रकार आहे. काँग्रेस आणि डावे पक्ष असे स्वतःचे हसू करून घेत असतानाच भाजपची नेतेमंडळी ज्या पद्धतीने प्रणवबाबूंची आरती ओवाळत आहेत तीही मजेशीरच म्हणायला हवी. २०१२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देऊ केला तेव्हा याच भाजप नेत्यांनी शिवसेनेविरुद्ध उठवलेले काहूर आज आम्हाला आठवते आहे. पी. ए. संगमा आणि प्रणव मुखर्जी हे दोन पर्याय त्यावेळी आमच्यासमोर होते. प्रणवबाबूंचा अनुभव, त्यांची योग्यता, राजकीय मुत्सद्देगिरी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाण आणि एकूणच विद्वान, निःस्पृह व्यक्तिमत्त्व म्हणून व्यापक देशहित डोळय़ांपुढे ठेवून आम्ही  प्रणवबाबूंना पाठिंबा दिला होता. त्यावेळी आज प्रणवबाबूंचे गोडवे गाणारे लोक आम्हाला शिव्याशाप देत होते. शिवाय राष्ट्रपती झाल्यानंतर पहिल्यांदा त्या अजमल कसाब आणि अफजल गुरू या अतिरेक्यांच्या दयेचा अर्ज फेटाळून लावा अशी विनंती शिवसेनेने मुखर्जींना केली होती. अर्थात प्रणवबाबूंनीही दयामाया न दाखवल्यामुळेच कसाब आणि अफजल गुरू पुढे फासावर लटकले हे सत्य आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिला म्हणून शिवसेनेवर दुगाण्या झाडणारे भाजपचे नेतेच आज प्रणवबाबूंची आरती ओवाळत आहेत, त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळत आहेत. २०१२ साली योग्यता असूनही ज्यांनी प्रणव मुखर्जी यांना राजकीयदृष्टय़ा अस्पृश्य ठरवले तेच आज प्रणवबाबूंचे गुणगाण गात आहेत. राजकीय स्पृश्य-अस्पृश्यतेची व्याख्या नव्याने सांगितली जात आहे. राजकारणाच्या पलीकडचा विचार असा असतो तर..!

टॅग्स :उद्धव ठाकरेप्रणव मुखर्जीभाजपाराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयराजकारण