Join us  

महाराष्ट्राशी भांडण उकरून काढणारे विजय सरदेसाई हे पोर्तुगीज समाजाची चमचेगिरी करताहेत - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 8:15 AM

गोव्यात येणा-या उत्तर भारतीय पर्यटकांबाबत नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी काढलेल्या उद्गारावरुन त्यांच्या चौफेर टीका करण्यात येत आहे.

मुंबई - गोव्यात येणा-या उत्तर भारतीय पर्यटकांबाबत नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी काढलेल्या उद्गारावरुन त्यांच्या चौफेर टीका करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सामना संपादकीयमधून सरदेसाई यांचा समाचार घेतला आहे.  ''पोर्तुगीज चालतील, पोर्तुगीज गुलामगिरीचे स्वागत करू, पण उत्तर हिंदुस्थानी नकोत असे सांगणारे मंत्री भाजपच्या मंत्रिमंडळात आहेत व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर त्यांच्या पाठिंब्याने सत्ता भोगीत आहेत. गोव्याचे गटार उत्तर हिंदुस्थानींनी केले असे जर गोव्याच्या भाजप सरकारमधील एक मंत्री विजय सरदेसाई यांना म्हणायचे असेल तर मग ते गटार साफ का करीत नाही? महाराष्ट्र आणि गोव्यात दरी निर्माण करणारे फूत्कार कुणी सोडत असेल तर गोमंतकीय जनतेनेच हे कारस्थान उधळून लावायला हवे'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सरदेसाई यांच्यावर टीका केली आहे. 

काय आहे आजचे सामना संपादकीय ?गोव्यात भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे. त्याच भाजप सरकारातील एक मंत्री विजय सरदेसाई यांनी उत्तर हिंदुस्थानी ‘भैया’ मंडळींवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. दिल्ली, हरयाणा, गुरगाव म्हणजेच उत्तरेकडून येणाऱ्या पर्यटकांनी गोव्याचा उकिरडा केला असल्याची तोफ भाजपशासित राज्याचे मंत्री सरदेसाई यांनी डागली आहे. उत्तरेकडील लोकांची वृत्ती चांगली नाही, ते जिथे जातील तिथे सर्व काही हडपण्याची त्यांची वृत्ती आहे. थोडक्यात, विजय सरदेसाई यांना असे सुचवायचे आहे की, उत्तर हिंदुस्थानातून जे हजारो किंवा लाखो पर्यटक गोव्यात येतात ते तिसऱ्या दर्जाचे ‘घटिया’ लोक आहेत, आम्ही गोवेकर इतरांपेक्षा वेगळे आहोत. त्यांनी असा टेंभा मिरवला आहे की, पन्नास वर्षांपूर्वी आम्ही संघर्ष केला व महाराष्ट्राशी संबंध जोडण्यास विरोध केला. सरदेसाई यांनी केलेले विधान बेजबाबदारपणाचे आहे. विशेषतः गोव्यासारखे राज्य हे पर्यटन उद्योगावर चालते. कश्मीरमध्ये ‘पर्यटन’ उद्योगास उतरती कळा लागल्यापासून तेथील जनतेसमोर रोजगार, पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कश्मीरात उद्योगधंदा नाही. पर्यटन हाच एकमेव उद्योग. अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवी यात्रा तर होत्याच, पण देशभरातून कश्मीरच्या नंदनवनात सैर करण्यासाठी लाखो पर्यटक येत होते. त्यामुळे हॉटेल्स, दुकानदारी, टॅक्सी, रिक्षा, घोडे, दाल सरोवरातील शिकारे यांचे अर्थकारण बरे चालले होते. दहशतवाद्यांनी हे अर्थकारण मोडून काढले व आता तेथील हे सर्व उद्योग बंद पडले. गोव्यासारख्या राज्यात ‘दारू’ करमुक्त आहे. समुद्र आहे, हवा बरी आहे, मासे आहेत. त्यामुळे पर्यटक जिवाचे ‘गोवे’ करायला येतात. अशावेळी त्या पर्यटकांचीच घाण वाटू लागली तर राज्य कसे चालायचे? फक्त नारळ, शहाळी, काजूफेणी विकून काय मिळणार? ते विकत घ्यायला तरी पर्यटक हवेतच आणि गोव्यामध्ये तर उत्तर प्रदेशच नव्हे, सर्वच प्रांतांमधून, विदेशांमधून पर्यटकांचा ओघ बारा महिने कायम असतो. आता या पर्यटकांनी बेशिस्त वागू नये हे खरेच, पण त्यांना शिस्त लावण्याचे काम प्रशासनाचे आहे. तेथे सरकार कमी पडते काय? प्रश्न इतकाच आहे की उत्तर हिंदुस्थानातील पर्यटकांनी गोव्याचे गटार केले असे सरदेसाई यांच्यासारखे मंत्री म्हणत आहेत, पण गोव्याची खरी वाट लावणारे लोक कोण आहेत याचा विसर त्यांना पडलेला दिसतो. अर्ध्याहून अधिक गोव्याचे समुद्रकिनारे हे अनैतिक धंदे करणाऱ्यांच्या विळख्यात आहेत. त्यात रशियन व नायजेरियन ‘ड्रग्जमाफियां’चा जोर आहे. अनेक गावांवर रशियन व नायजेरियन झेंडे फडकत आहेत आणि त्या गावात एखादा गुन्हा घडलाच तर गोव्याचे पोलीसही तिथे प्रवेश करू शकत नाहीत. पोलिसांवर हल्ले होतात व नायजेरियन माफियांचे काहीच वाकडे होत नाही. पन्नास वर्षांपूर्वी महाराष्ट्राशी संघर्ष करून आम्ही आमचे स्वतंत्र अस्तित्व राखले असे आज जे मंत्री म्हणत आहेत त्यांनी रशियन व नायजेरियन माफियांशी संघर्ष करून त्यांचे झेंडे उतरवून दाखवावेत. गोव्यात आजही पोर्तुगीज अस्मिता जपणाऱ्या समाजाचे नेतृत्व विजय सरदेसाईसारखे लोक करीत आहेत. ज्या भाऊसाहेब बांदोडकरांनी गोव्याचे सांस्कृतिक नाते महाराष्ट्राशी जोडले व टिकवले, गोवा हे हिंदू राज्य असल्याचे विधानसभेत ठणकावून सांगितले त्या विचारांवर गुळण्या टाकण्याचे काम सरदेसाई करीत आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे त्यांना पाठबळ लाभले आहे. गोव्याची एक संस्कृती आहे आणि हे एक स्वतंत्र राज्य आहे, तरीही सांस्कृतिक आणि भावनिकदृष्ट्य़ाही गोवा महाराष्ट्रालाच जोडलेला आहे. महाराष्ट्राशी भांडण उकरून काढणारे सरदेसाई हे तेथील पोर्तुगीज समाजाची चमचेगिरी करीत आहेत. पोर्तुगीज चालतील, पोर्तुगीज गुलामगिरीचे स्वागत करू, पण उत्तर हिंदुस्थानी नकोत असे सांगणारे मंत्री भाजपच्या मंत्रिमंडळात आहेत व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर त्यांच्या पाठिंब्याने सत्ता भोगीत आहेत. हा कसला राष्ट्रवाद? गोवा मुक्तीच्या लढ्य़ात महाराष्ट्राचे मोठे योगदान होते. अनेक मराठी वीर पत्रादेवीच्या नाक्यावर शहीद झाले. एस. एम. जोशी, मधू लिमये, नानासाहेब गोरे यांनी त्या तुकडीचे नेतृत्व केले. तेव्हा सरदेसाई कोणत्या गोधडीत रांगत होते? गोव्याचे गटार उत्तर हिंदुस्थानींनी केले असे जर गोव्याच्या भाजप सरकारमधील एक मंत्री विजय सरदेसाई यांना म्हणायचे असेल तर मग ते गटार साफ का करीत नाही? महाराष्ट्र आणि गोव्यात दरी निर्माण करणारे फूत्कार कुणी सोडत असेल तर गोमंतकीय जनतेनेच हे कारस्थान उधळून लावायला हवे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामनोहर पर्रीकरभाजपा