Join us  

डोकलाममध्ये चीन; राज्यकर्त्यांच्या कानात धोक्याच्या घंटेचा आवाज घुमेल काय?- उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 7:49 AM

डोकलाम विवादावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

मुंबई - भारत आणि चीनमध्ये डोकलामवरुन निर्माण झालेला संघर्ष संपून आता 5 महिने उलटले आहेत. पण या काळात चीन अजिबात शांत बसून नव्हता. भारत आणि चीनमध्ये डोकलाममधल्या ज्या भागावरुन वाद होता तिथून दोन्ही देशांनी आपआपले सैन्य मागे घेतले पण चीनने त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशामध्ये सुसज्ज असा लष्करी तळ उभे केले आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला हाणला आहे. 

पाकिस्तानवर दिल्लीत बसून डोळा वटारणे व पाकड्यांचा वापर गुजरातसारख्या राज्यांच्या निवडणुकीत करून घेणे सोपे आहे, पण आपली खरी लढाई चीनशी आहे व पाकिस्तान ही चीनची फक्त ढाल आहे. आपण ढालीवर दंडुके आपटत आहोत आणि चीनची तलवार ‘म्यान’ करण्यात अपयशी ठरलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

काय आहे आजचे सामना संपादकीय ?इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू हे बुधवारी बराच वेळ अहमदाबादेत होते. ते शोभायात्रेत सहभागी झाले. साबरमती आश्रमात जाऊन त्यांनी चरखा चालवला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हवेत पतंगही उडवले. एकंदरीत दोन पंतप्रधान मित्रांनी बुधवारी ‘जिवाचे अहमदाबाद’ केले व या दोस्तीमुळे पाकिस्तानच्या पोटात भीतीचा गोळा आला असून त्यांचे पाय लटपटू लागले असल्याच्या वार्ताही प्रसारित झाल्या. नेतान्याहू साहेबांना श्री. मोदी हे ‘आपनु गुजरात’ दाखवीत असतानाच तिकडे चीनने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली व त्याची खबर अहमदाबादला पोहोचेपर्यंत नेतान्याहू साहेब हे मुंबईस उतरले होते. चिनी सैन्याने डोकलाम सीमेवर नुसतीच धडक मारली नाही, तर जवळ जवळ त्या भूमीवर ताबाच मिळवला आहे. डोकलाममध्ये मोठय़ा संख्येने चिनी सैनिक जमा झाले आहेत. तिथे टॉवर, चौक्या उभ्या केल्या आहेत. शस्त्रास्त्रांनी गच्च भरलेली वाहने उभी आहेत व सात-आठ हेलिपॅडही निर्माण झाली आहेत. म्हणजे दोन-चार महिन्यांपूर्वी चीनने जी अचानक माघार घेतली तो एक बनाव होता व दोन पावले माघार घेत चीनने दहा पावले धडक मारली आहे. ‘‘चीनबरोबरचा ‘डोकलाम’ विवाद पंतप्रधानांनी किती शांतपणे संपवला पहा. काँग्रेस किंवा अन्य राजवटीत हे असे कधीच घडले नव्हते’’ या वैचारिक पतंगबाजीचा ‘मांजा’ काल लाल माकडांनी कापला व सीमेवरून धोक्याची घंटा वाजवली, पण उत्सवात व स्वप्रेमात मग्न असलेल्या आमच्या राज्यकर्त्यांच्या कानात या ‘घंटे’चा आवाज घुमेल काय? पाकिस्तानवर दिल्लीत बसून डोळा वटारणे व पाकड्यांचा वापर गुजरातसारख्या राज्यांच्या निवडणुकीत करून घेणे सोपे आहे, पण आपली खरी लढाई चीनशी आहे व पाकिस्तान ही चीनची फक्त ढाल आहे. आपण ढालीवर दंडुके आपटत आहोत आणि चीनची तलवार ‘म्यान’ करण्यात अपयशी ठरलो आहोत. ‘‘चिनी सैनिकांनी परत फिरावे नाहीतर आम्ही सामना करू’’ असे आपल्या लष्करप्रमुखांनी बजावले आहे. हे बजावणे पिपाणी वाजवण्यासारखे ठरू नये. सीमेवर लढावेच लागेल. पतंग हवेत उडतात, युद्ध जमिनीवरच होते. 

 

टॅग्स :उद्धव ठाकरेनरेंद्र मोदीचीनडोकलाम